सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता ‘नाळ भाग 2’मध्ये (Naal 2) मिळणार आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) निर्मित ‘नाळ भाग 2’ दिवाळीत म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर (Naal 2 Trailer) सोशल मीडियावर झळकला आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘नाळ’मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला ‘नाळ भाग 2’मध्ये मिळणार आहे. ट्रेलरमध्ये चिमुकल्या गोंडस चिमीच्या अभिनयावर सगळे फिदा झाले आहेत. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे 'नाळ'हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता, तसाच 'नाळ भाग 2'ही आहे.