गाण्यातून झळकणारा उत्साह ताल धरायला भाग पाडतो तसाच मनातील भाव-भावनांचा सूर ही गाण्यातच सापडतो. आशेचा असाच सूर घेऊन गायक डॉ. ओजस जोशी (Dr Ojas Joshi) ‘शोधूया’ (Shodhuya Song) हे नवं गाणं घेऊन आले आहेत. संगीतकार सलील कुलकर्णी (Salil Kulkarni) यांच्या हस्ते हे गाणं नुकतेच प्रकाशित करण्यात आले. ‘शोधूया शोधूया आनंदाच्या वाटा’ असे बोल असणारं हे गाणं नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला उभारी देणारं असेल. या गाण्याचा अनोखा अंदाज आजच्या तरुणाईसाठी विशेष ठरेल, असा विश्वास गायक डॉ. ओजस जोशी व्यक्त करतात. तरुणाईला दिशा देण्याचा ओजसचा हा प्रयत्न स्तुत्य असून भविष्यात अजून चांगली गाणी तो करेल असा मला विश्वास असल्याचे सलील कुलकर्णी म्हणाले. हे गाणं शिवानी गोखले यांनी लिहिले असून अमेय गुंडाळे यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. गाण्याचे छायांकन, संकलन कवीरा स्पर्श यांचे आहे.