नव्वदाव्या वाढदिवशी आशा भोसले सिद्धिविनायकाच्या चरणी लीन

    आज सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले (Aasha Bhosale) यांचा आज ८९ वा वाढदिवस असून त्या नव्वदीत पदार्पण करीत आहे. आपल्या सुरेल आवाजाने मराठी हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या आशा भोसले बुधवारी वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी मुंबई येथील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर (Siddhivinayak Temple)  येथे पोहोचल्या.

    नव्वदाव्या वर्षात पदार्पण करीत असताना गायिका आशा भोसले यांनी दिवसाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने केली. यावेळी सिद्धिविनायक मंदिरातील पहाटेची आरती आशा ताईंच्या हस्ते पारपडली. यावर्षी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) म्हणजेच, आशाताईंच्या मोठ्या भगिनी यांचं निधन झालं आहे. तेव्हा यंदा आशा भोसले या वाढदिवस साजरा करणार नाहीत. आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये झाला असून त्यांना त्यांच्या कुटुंबातूनच संगीताचे बाळकडू मिळाले.

    आशा भोसले यांनी १९४८ पासून हिंदी चित्रपटांमध्ये गाणे सुरू केले आणि त्यानंतर त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणे गायले. आशा ताईंना फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये आतापर्यंत ७ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे. आशा भोसले यांना २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभादेवीसिंह पाटील यांच्या हस्ते ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आशा भोसले यांनी ‘माय’ चित्रपटातही काम केले आहे. त्याच्या कामगिरीचे कौतुकही झाले. २२ भाषांमध्ये ११ हजारहून अधिक गाणी गाऊन आशा ताईंनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.