राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ (Goshta Eka Paithanichi) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. ही गोष्ट आहे एका अशा गृहिणीची, जिचे पैठणी घेण्याचे स्वप्न आहे. या सर्वसामान्य स्वप्नाची पूर्तता करताना तिच्या आयुष्यात येणाऱ्या काही अनपेक्षित घटनांचा हा रंजक प्रवास आहे. नुकतीच ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटातील एक ठसकेबाज लावणी सर्वांच्या भेटीला आली आहे. ‘तुमच्यासाठी रेडी राया नेसून पैठणी’(Paithani Song) असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडे (Bela Shende) यांच्या आवाजाने या लावणीला चारचांद लागले आहेत. तर या गाण्याचे बोल आणि संगीत माणिक - गणेश यांचे आहे. गिरीजा ओक -गोडबोले (Girija Oak - Godbole) आणि मिलिंद गुणाजी (Milind Gunaji) यांच्यावर चित्रित या गाण्यात पैठणीचे सौंदर्य अधोरेखित करण्यात आले आहे. सायली संजीव (Sayali Sanjeev), सुव्रत जोशी (Suvrat Joshi), मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.