स्टोन आर्टच्या माध्यमातून दिवंगत अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना मानवंदना

    ठाणे : मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे ९ ऑगस्ट रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच अभिनेते प्रदीप पटवर्धन यांना कलेच्या माध्यमातून मानवंदना देण्यासाठी ठाणे शहरातील स्टोन आर्ट पोट्रेट साठी प्रसिद्ध असलेले चित्रकार सुमन दाभोलकर प्रदीप पटवर्धन यांचे स्टोन आर्ट साकारले आहे.

    मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली गावाचे असणारे सुमन त्यांच्या गावातील नदी काठी सापडणाऱ्या विविध आकारी दगडांवर रंगांची उधळणं करून व्यक्तींची हुबेहूब चित्र रेखाटतात. सर्वाधिक स्टोन आर्ट पोट्रेट साकारल्याबद्द्ल चित्रकार सुमन दाभोळकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी अमिताभ बच्चन, नाना पाटेकर, स्वप्नील जोशी, महेंद्र सिंह धोनी, उद्धव ठाकरे, इंदिरा गांधी, अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले अशा अनेक मान्यवरांची स्टोन आर्ट पोट्रेट साकारली आहेत.

    अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आयुष्य प्रत्येक क्षेत्रातील कलाकारासाठी प्रेरणादायी आहे, तेव्हा त्यांना माझ्या कलेच्या माध्यमातून वंदन करण्याचा मी प्रयत्न केला असे, सुमन दाभोलकर (चित्रकार) यांनी सांगितले.