बाप्पांच्या आगमनाने बाजारपेठा फुलल्या, एपीएमसी बाजारपेठेत खरेदीसाठी उडाली झुंबड ; कोरोनाचे भय देखील गेले वाहून

कोरोनाच्या या संकटात मात्र सणांमुळे अनेकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत नवी मुंबईसह, मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, उरण व रायगड येथून देखील नागरिक खरेदीसाठी येत आहेत. ही झुंबड पाहून कोरोनाची कसलीच चिंता नागरिकांना नसल्याचे जाणवत असून मास्क नाकाखाली करून, एकमेकांना खेटून खरेदी करताना नागरीक दिसत आहेत.

  सिद्धेश प्रधान, नवी मुंबई: गणेशोत्सव म्हंटले की महाराष्ट्राची आठवण येतेच. त्यातही मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई व रायगड व कोकण म्हणजे गणेशोत्सवाला जत्रेचे रूप येते. प्रत्येकवर्षी नव वर्ष उजाडल्यावर प्रत्येकजण कॅलेंडर उचकटून पाहतो ते गणेशोत्सव व दिवाळी कधी आहे. इतकी आतुरता या दोन सणांची लागलेली असते. देशातील दोन मोठे सण. त्यामुळे प्रथम येणाऱ्या गणेशोत्सवासाठी प्रत्येकजण जून महिन्यासून खरेदी, सजावटीची त्यासाठी पैसे साठवण्याची प्लॅनिंग करत असतो. याच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन तोंडावर आले असताना यंदा बाजारपेठा सजल्या व फुलल्या आहेत.

  कोरोनाच्या या संकटात मात्र सणांमुळे अनेकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत नवी मुंबईसह, मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, उरण व रायगड येथून देखील नागरिक खरेदीसाठी येत आहेत. ही झुंबड पाहून कोरोनाची कसलीच चिंता नागरिकांना नसल्याचे जाणवत असून मास्क नाकाखाली करून, एकमेकांना खेटून खरेदी करताना नागरीक दिसत आहेत.

  प्लास्टिक व थर्माकोल बंदीमुळे आकर्षक मखरांची जागा कागदी, पुठ्ठे व कापडी मखरांनी घेतली आहे. मखर विक्रेत्यांनी लागलीच ही नवी कल्पना अवलंबून सुरेख नक्षीदार मखर व दुमडून पुन्हा वापरता येतील असे बनवले आहेत. यात लाकडी गोलाकार पट्ट्या बनवत आकर्षक प्लास्टिकच्या रंगीबेरंगी फुलांची माळ लावण्यात आली आहे. तर अनेकांनी लाकडी मोगलाई, राजस्थानी नक्षी व कलाकुसर केलेले कायमस्वरूपी मखर बनवून घेतलेले पाहायला मिळत आहेत.

  विविध आकारांचे लाकडी मखर देखील वाजारपेठांत पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे सुतार काम करणारे यावेळी जास्तच बिझी दिसत आहेत. घरातील गणेशासाठी  डेकोरेटिव्ह कागदी फुले, फुलांच्या माळा देखील बाजारात दिसत आहेत. यात बाप्पाचे आवड असलेले जास्वंद, कमळ यासह झेंडू, मोगरा, गुलाब अशा विविध प्रकारची फुले व माळा दिसत आहेत. त्यातच प्लॅस्टिकपासून तयार केलेले मोत्यांच्या माळा व त्यात गुंफलेले हिरवे, लाल, निळे, जांभळे, पिवळे खडे लक्ष वेधून घेत आहेत.

  लाईटच्या माळा देखील दुकानांत दिसत आहेत. यासह गणपतीचे आगमन होताना शास्त्र म्हणून बाप्पाच्या खांद्यावर टाकून व बाप्पाचे मुख झाकुन आगमन होते. त्यासाठी लागणारे सोनेरी व चंदेरी जरतारी नक्षी असलेले लाल, निळे, हिरवे, जांभळे, गुलाबी, पिवळे शेले घेण्यास देखील झुंबड उडालेली पाहण्यास मिळत आहे.  यासहची आकर्षक जानवे, मोत्यांच्या कंठया लक्ष वेधून घेत आहेत.

  गणपतीत सर्वात महत्वाची मानली जाते आरती. यात उत्साह असतो तो झांजा व वाद्ये यांचा. झांजा व वाद्ये देखील बाजारात अली आहेत त्यानाही अच्छे दिन आले आहेत. गणपती म्हंटले की रोषणाई आलीच त्यामुळे घराबाहेर लावण्यात येणारी तोरणे, मखरावर लावण्यात येणाऱ्या माळा व डेकोरेशनसाठी सोडण्यात येणारी विविध तोरणे बाजारात अली आहेत. यात म्युजिकवर चालणारी तोरणे देखील आहेत.

  यासह बाप्पासाठी लागणारे पाट, त्या पाटांना सजवण्यासाठी विविध रंगांतील सोनेरी व चंदेरी नक्षीदार कागद देखील बाजारात पाहण्यास मिळत आहेत. कोणतेही शुभ कार्य करताना लागणाऱ्या श्रीफळाला म्हणजेच नारळाला देखील प्रचंड मागणी दिसून येत आहे.

  ज्वेलर्समध्ये देखील गर्दी

  गणेशोत्सवात सर्वात म्हत्वाचं म्हणजे बाप्पांचे व गौराईचे अलंकार. एक ग्रॅम सोन्याचा वर्ख असलेले तर काही अस्सल चांदीचे अलंकार घेण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.  मुकुट, भिकबाळी, बाजूबंद, कंठी, दुर्वांचा, जास्वंद, कमळाचा हार, सोंड, कमळ, वाळे, हातातले तोडे, त्रिशूळ, मोदक, जास्वंदीचे व कमळाचे फुल,

  उंदीर मामा, केवड्याचे पान, जानवे, पान-सुपारी, नक्षीदार कान, हस्तिदंत, मोत्याच्या माळा तर गौरीचे दागिने देखील घेतले जात असून यात नथ, वेणी, कानातले डुल, वेण्या तसेच गळ्यातील हार, कंबर पट्टा, मंगळसूत्र, बाजूबंद, पाऊले, घेण्यासाठी ज्वेलर्सकडे गर्दी आहे.

  त्यासह गौरी तयार करण्यासाठी गौरीचे  लमातीचे, कागदाचे, पितळ्याचे मुखवटे, मुकुट, तिवई, हात, शिवलेल्या नऊवारी साड्या, पाय, पावलं देखील पाहण्यास मिळत आहेत. यासह रेडिमेड गौरींना देखील मागणी आहे.

  पितळ्यांच्या नक्षीदार समयांना मागणी

  गणपतीचे आगमन होऊन प्रतिष्ठापना होताच २४ तास बाप्पासामोर शास्त्रानुसार समई तेवत ठेवावी लागते. त्यामुळे  चांदी, तांबे व पितळ्याच्या पेशवेकालीन नक्षीदार समयांना देखील मागणी आहे.  त्यासह इतर धातूंच्या आकर्षक समया देखील घेतल्या जात आहेत.

  मसाला अगरबत्त्यांना व अत्तराला प्रचंड मागणी

  बाप्पाच्या आगमनासोबत मनाला प्रसन्नता आणणाऱ्या विविध अगरबत्त्याना देखील मागणी आहे. यात सर्वाधिक चंदन, केवडा व मोगरा अगरबत्तीची चलती आहे. त्यासह मसाला अगरबत्त्या भाव खाऊन जात आहेत. यात तासभर जळणाऱ्या अगरबत्ती देखील आहेत. अगदी २ ते ३ फूट लांबीच्या अगरबतत्त्या बाजारात आल्या आहेत. तसेच विविध रंगांच्या अगरबत्त्या दिसून येत आहेत. सुगंधी अत्तरांची देखील मागणी अधिक आहे.

  पुरणपोळ्या, रव्याचे लाडू, उकडीचे मोदक व चिवड्यांसाठी मागणी

  सध्या धाकचुकीच्या व कामात व्यस्त असणाऱ्या गृहिणींना गोडाधोडाचे खाद्यपदार्थ तयार करण्यास वेळ मिळतोच असे नाही. मात्र त्यामुळे घरघुती पदार्थ तयार करणाऱ्या गृहिणींकडे मात्र चांगल्याच संधी चालून आल्या आहेत. गौरीच्या आगमनावेळी तांदळाच्या भाकरींचा देखील नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे त्यासाठी लागणाऱ्या  तांदळाच्या भाकरी, पुरणपोळ्या, तर बाप्पासाठी लागणारे उकडीचे मोदक, रव्याचे लाडू, चिवड्यांच्या भल्या मोठ्या ऑर्डर सध्या अनेक गृहिणींना  मिळाल्या आहेत.

  कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या अनेकांना बाप्पाच्या आगमनाने आर्थिक संधी चालून आल्या आहेतएक पुरणपोळी ४० रुपये तर उकडीचे मोदक २५ रुपये नाग तर तांदळाची भाकरी १५ रुपये नग किंमतीला विकली जात आहे. यासह पातळ पोह्यांचा, मक्याचा चिवडा, बुंदीचे लाडू, अळू वड्यांना देखील मागणी आहे.