भाव तिथं देव

घराघरात बसणाऱ्या गणपतीच्या उपासनेला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रुप दिले आणि मोठा गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्रात जोमाने सुरू झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात तसं करण्यामागे वेगळे संदर्भ असले तरी आजही लोकांनी एकत्र येण्याचं, त्या निमित्ताने चार चांगल्या गोष्टी सामुहिकतेने करण्याचं आणि त्यातून जनजागृती, एकदिलाने काम करण्याची मानसिकता हे गणेशोत्सवाचं फलित आहेच. पण उत्सव जसा मोठा होऊ लागला तसा उत्साह पण वाढला आणि मग उत्साहाच्या भरात अनेक अनावश्यक गोष्टींचीही त्यात भर पडत गेली. उत्सव साजरा करतानाच्या भानाविषयी..

  • निकीता भागवत

  त्या दोघी बाजारात भेटल्या. एकमेकींची विचारपूस झाली, आयुष्यातल्या घटनांची देवाण-घेवाण झाली, गणपती येणार म्हणून तयारी कुठवर आली आहे, त्याचीही चौकशी झाली. चौकशी करता करता रेखा सुनीताला म्हणाली, “अगो, या वर्षी ना गणपती बाप्पासाठी चांदीच्या दुर्वांचा हार, चांदीचा मोदक आणि चांदीचं उपरणं घेणार आहे!” त्यावर सुनीता म्हणाली, “अगं, हे तर माझ्याकडे कधीपासूनच आहे.  यावर्षी मी सोन्याचं पॉलिश असलेला मुकुट गणपतीला घेतलाय आणि आम्ही तर जास्वंदीच्या फुलांचा हार ही चांदीचाच घालतो गणपतीला. आमच्याकडे गौरी की नाही, खड्याच्या असतात…त्याही दोन वर्षांपूर्वी मी चांदीच्याच करून घेतल्या …कुठे ते दगड शोधायला जाणार दरवेळी….?”

  मी बाजूलाच खरेदी करत उभी होते त्यामुळे हा सगळा संवाद माझ्या कानावर पडला.

  आषाढ सुरू होतो तशी आपल्या भारतीय उपखंडात सणांची मांदियाळी असते आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीपासून सुरू झालेला हा उत्सवांचा मेळा पार संक्रांतीपर्यंत चालतो. आषाढ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक हे चार महिने तर अगदी उत्सवांचा कळसाध्याय असतात.

  त्यात श्रावण म्हणजे सणांचा राजा. भाद्रपदात गणपती बाप्पा येतात त्यामुळे उत्साहाला उधाण आलेलं असतं. घराघरात बसणाऱ्या गणपतीच्या उपासनेला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक रुप दिले आणि मोठा गणेशोत्सव आपल्या महाराष्ट्रात जोमाने सुरू झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात तसं करण्यामागे वेगळे संदर्भ असले तरी आजही लोकांनी एकत्र येण्याचं,  त्या निमित्ताने चार चांगल्या गोष्टी सामुहिकतेने करण्याचं आणि त्यातून जनजागृती, एकदिलाने काम करण्याची मानसिकता हे गणेशोत्सवाचं फलित आहेच. पण उत्सव जसा मोठा होऊ लागला तसा उत्साह पण वाढला आणि मग उत्साहाच्या भरात अनेक अनावश्यक गोष्टींचीही त्यात भर पडत गेली.

  आज आपण आणि घरगुती दोन्ही गणेशोत्सव यांच्याबद्दल थोडसं बोलूया. आधी घरातला गणपती बाप्पा. कारण,  इथूनच त्याची सुरुवात झाली. शतकानुशतकं आपल्या देशात,  राज्यात गणेश चतुर्थीचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. पण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आलेला बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत अनेकांच्या घरात वास करून असतो. वातावरण भारून टाकतो, उत्साहाला उधाण आणतो. घर आनंदानं, समाधानाने भरून जातं. काहींच्या घरी पूर्ण दहा दिवस तर कुठे पाच दिवस, तर कोकणात वगैरे अनेक ठिकाणी बाप्पा दीड दिवस आपल्या भक्तांकडे राहतो. जो तो आपापल्या परीने बाप्पाची सेवा करण्यात मग्न असतो. बाप्पाचे आवडते मोदक खास वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यासाठी बनवले जातात. म्हणजे शेवटी खातो आपणच!! भक्तिभावाने बाप्पाला अर्पण करून नैवेद्य म्हणून सेवन केले जातात. तुम्ही म्हणाल हे सगळं आम्हाला माहीत आहे हो, यात अक्षरभानमध्ये लेख लिहिण्यासारखं काय?

  तर, आता सांगते. या आपल्या अतिउत्साही भक्तांकडून कळत नकळत काही गोष्टी अशा घडतात,  घडत जातात आणि घडतच राहतात की मुख्य सण बाजूला पडून कुठल्यातरी दुसऱ्याच गोष्टींचा गवगवा खूप होतो.

  म्हणजे नेमकं काय होतं?

  पहिला परिच्छेद आठवा. त्यातल्या  भेटलेल्या त्या  दोघी मैत्रिणी गणपती बाप्पाच्या तयारीविषयी बोलताना काय काय बोलल्या ते लक्षात घ्या. मंडळी, आपली संस्कृती अत्यंत पर्यावरण पूरक,  निसर्गाची हानी होऊ न देणारी आणि निसर्गाच्या गोष्टी निसर्गातच पुन्हा एकदा मिसळून टाकणारी आहे. माझे आजोबा नेहमी म्हणत असत,  ‘देवाच्या भक्तीला काय लागतं? दोन हात एक मस्तक पुरेसं असतं. भाव तिथे देव. अर्थात आपल्यातल्या अनेकांना हे मान्य नाही, त्यामुळेच बाप्पाची सेवा करताकरता, कळत नकळत आपण ह्या गोष्टी हळूहळू सुरु करतो आणि नंतर त्याचा बडेजाव करू लागतो. आता मला सांगा श्रावण-भाद्रपदात उगवलेली असंख्य पानं-फुलं वेली त्याची पत्री, त्यांची फुलं हे सगळं निसर्गाने निर्माण केलेले धन. त्याचा योग्य वापर करत, आपल्या आवडत्या देवाला आवाहन आणि त्यातून आपला सण साजरा करणं, इतकी साधी संकल्पना आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिली.

  ज्या दूर्वा आतापर्यंत अंगणात कुठेही उगवत होत्या, जास्वंद तर पूर्वी प्रत्येक घरात बहरून येत होतं. मोदक पौष्टिक आहार म्हणून त्या त्या काळात खाणं गरजेचं होतं. त्या सगळ्याचा नैवेद्य झाला आणि बाप्पाला अर्पण करू लागलो. मग आता मला सांगा, जो बाप्पा इतक्या साध्या गोष्टींची आपल्याकडून अपेक्षा करतो, ज्याच्या मूर्तीला मुर्तीकाराने इतकी सुंदर वस्त्र घातलेली आहेत, कोरीव काम करून रेखाटलेले आहेत, त्या बाप्पाला दागिने, चांदीचा मोदक, चांदीचा उंदीर आणि चांदीच्या जास्वंदाची फुलं दूर्वा देऊन आपण काय साध्य करतो….

  मग यातले अनेक लोक म्हणतात, “आमची ऐपत आहे!”. पण मंडळी, मला खरं सांगा देव पैशाची ऐपत बघून येतो का हो?  ‘भाव भक्तीचा भुकेला तू मुरारी’ उगाच का कोणी कवी म्हणतो.

  अंगणात उगवणाऱ्या दूर्वा, घराच्या आजूबाजूलाच, गल्लीत इकडे-तिकडे मिळणारी साधीशी टवटवीत ताजी फुलं आणि घरातल्या गृहिणीने मनापासून गूळ खोबऱ्याचं सारण करून तयार केलेले मोदक. इतक्या साध्या अपेक्षा आहेत आपल्या देवाच्या. खरं म्हणजे देवाच्या नावाने हे सगळं आपल्यासाठीच, प्रेमाच्या माणसांसाठी. उकडीचा मोदक आपण खायचा आणि बाप्पाला चांदीचा मोदक हे गणितच मला  कळत नाही.

  गौरी म्हणजे माहेरवाशिणीला एक दिवस माहेरी जाऊन आराम करण्याचा दिवस. घरातल्या वहिन्या, बायका या सगळ्यांना घेऊन हसत-खेळत नदीवर किंवा कुठल्यातरी पाणवठ्यावर जायचं आणि तिथले सात खडे गौरी म्हणून घरी आणायचं. अगदी खड्यांची ही मनापासून पूजा करायला सांगणारी आपली संस्कृती. पाणवठ्यावर जाणं सुखदुःखाच्या गप्पा मारायच्या आणि येताना मात्र अजिबात न बोलता गौरींना आपल्या सोबत घेऊन घरी येणं, इतका हा साधासा सण. कालौघात नदी तर सोडाच पण पाणवठेही उरलेले नाहीत मग बिल्डिंगच्या टाकीपाशी जाऊन सात दगड आता-आतापर्यंत उचलून आणले जात होते. पण अलीकडे मात्र चांदीचे खडे करून घरातल्या घरातच सगळ्या गोष्टी केल्या जातात.

  मला नेहमी असं वाटतं की आपल्या संस्कृतीत शून्याला महत्त्व आहे, वर्तुळाला महत्त्व आहे. म्हणजे एक गोष्ट परत त्याच जागी येऊन थांबते. तसंच आपल्या सणावारांचंही होणार आहे. गणपती बाप्पा देव्हाऱ्यातून मखरात आला, मखरातून तो इको फ्रेंडलीकडे आलाय. गेली दोन वर्ष आपापल्या घरात गणपती बाप्पाने आपला सण साधेपणाने आपल्याकडून साजरा करून घेतला. उत्सवातही साधेपणा जपणं, हेच मंडळी खरं अक्षरभान आहे. कारण साधेपणातून सुरू झालेल्या गोष्टी, रूपात येऊन, उत्साहाच्या भरात अतिशयोक्तीकडे झुकू लागल्यात. त्यामुळेच पुन्हा एकदा निसर्ग आपल्याला साधेपणाची साद घालतोय. त्यामुळेच अगदी परवावर आलेला गणेशोत्सव, घरात साधेपणानं साजरा करुयात.

  आता थोडं सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलूया. उत्सव मोठा करायचा नाही म्हटल्याबरोबर, मागच्या वर्षी सगळ्या मंडळांनी सरकारच्या विरोधात निदर्शने केली आणि उत्सव साजरा करायला परवानगी द्यावी यासाठी आंदोलनंसुद्धा झाली.  यंदाही थोडीफार स्थिती तीच आहे. खरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने आत्ता परिस्थिती अशी नाही ही सगळ्यांनी एकत्र येऊन सण साजरे करावेत. सण कोणताही असो कोणत्याही धर्माचा असो सामाजिक नीती बंधनांची नियमावलीही सगळ्यांना सारखीच असली पाहिजे. एकामुळे दहा जणांना होणारा रोग पसरवण्यासाठी आहे, आमंत्रण असल्यासारखं. यावर्षीही आपण तेच वागतो आहोत. पुन्हा एकदा तीच ओळ आठवते भावभक्तीचा भुकेला रे मुरारी तुम्ही किती मोठ्या प्रमाणात सण साजरा करता, कोणाकडे जाऊन देणगी मागता, किती मोठा मंडप घालता, याला माझ्या दृष्टीने फार महत्त्व नाही. लोकमान्यांनी ज्या हेतूने या सणाची सुरुवात केली, तो हेतू आपण कायम जागृत ठेवला तर आपल्याला सण साजरा करावा की नाही असे प्रश्नच पडणार नाहीत. हे नियम सगळ्यांनाच आहेत. म्हणजे ते सगळ्यांनीच पाळायला हवे आहेत. मग नाताळ असो नवीन वर्षाची पार्टी असो ईद असो. सण करताना प्राथमिक भाग हे समाजभान असायला हवे. उत्क्रांतीचा अर्थ म्हणजे नवीन गाणे उलगडत जाणे. हळू हळू, होता होता निसर्गापासून दूर जात जात पण निसर्गाच्या जवळ आलो पाहिजे. पूजा परत एकदा निसर्गातच मिळून मिसळून गेली पाहिजे. मग ना मूर्तींचं प्रदूषण होईल ना प्लास्टिकच्या फुलांचे निर्माल्य. एवढं अक्षरभान तर आपल्याला यायलाच हवं.