पुण्यनगरीतील मानाच्या  चौथ्या तुळशीबाग गणपतीचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये  शाब्दिक चकमक ; कार्यकर्त्यांनी परवानगी नसताना वाजवले ढोल

मिरवणूक व वादनाला परवानगी नसतानाही मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीसमोर ढोल वादन करण्यात आले. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आणि कार्यकर्ते, वादक यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे

    पुणे: कोरोनाच्या सावटामुळे सर्वत्र गणेश विसर्जन साधेपणाने करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. तसेच पुण्यातील बाप्पाचं विसर्जन अत्यंत साधेपणाने करावे असे आदेश प्रशासनाने दिले होते मात्र प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मिरवणूक व वादनाला परवानगी नसतानाही मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणपतीसमोर ढोल वादन करण्यात आले. मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस आणि कार्यकर्ते, वादक यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे.

    आज सकाळपासूनच शहरात मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालीम या तीन मानाच्या मंडळांनी जयजयकार करत बाप्पाला निरोप दिला. पण तुळशीबाग गणपतीसमोर ढोल, ताशांचे वादन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ढोल वादकांची नावं लिहून घेतली आहेत. तसेच ढोलही ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यामुळं कारवाई होण्याची शक्यता असल्याच दिसून येत आहे. यावेळी कार्यकर्त्यानी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांना आम्ही परवानगी घेतल्याच सांगण्यात आलं आहे.

    आले आले रे तुळशीबागवाले आले, मंगलमूर्ती मोरया च्या जयजयकार करत तुळशीबाग गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी मंडळाचे नितीन पंडित म्हणाले, आता पोलिसांनी ढोल ताब्यात घेतले होते. आम्ही रीतसर २ – २ ढोल ताशांची परवानगी मागितली होती. त्यामुळं कारवाई होणार नाही. पोलिसांनी ढोल परत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.