लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय गोव्यात पर्यटन सुरु होणार नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

गोव्यात (Goa)कोरोना संसर्गाचा प्रसार (Corona Spread In Goa) रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये(Curfew) २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे.

    राज्यातील प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तीला कोरोनावरील लसीचा(Corona Vaccine) कमीत कमी एक डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन(Tourism In Goa) पुन्हा सुरू होणार नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

    गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनीही पर्यटन व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. “किनारपट्टीवरील संपूर्ण लोकांचे पूर्णपणे लसीकरण केल्यावरच पर्यटन पुन्हा सुरू झाले पाहिजे. गोव्याचे पर्यटन उद्योग आम्ही कायमच बंद ठेवू शकत नाही कारण ते आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कणा आहे,” असे अजगावकर म्हणाले.

    गोव्यात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसिकांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले.

    “जोपर्यंत आम्ही राज्यभर लसीचा पहिला डोस देत नाही तोपर्यंत येथे पर्यटन सुरू होणार नाही. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते उद्दीष्ट साध्य झाल्यावरच आम्ही पर्यटन पुन्हा सुरु करण्याचा विचार करू,” असे सावंत म्हणाले.