pramod sawant

येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ३ मे रोजी सकाळपर्यंत गोव्यामध्ये लॉकडाऊन(lockdown in goa) लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे.

  महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.आता पर्यटकांच्या लाडक्या गोवा राज्यातही लॉकडाऊन लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत(pramod sawant declared lockdown in goa) यांनी ही माहिती दिली आहे.

  येत्या २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ३ मे रोजी सकाळपर्यंत गोव्यामध्ये लॉकडाऊन(lockdown in goa) लागू असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि औद्योगिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

  गोव्यातील कसिनो, हॉटेल, पब हे देखील लॉकडाऊन दरम्यान बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच गोव्याच्या सीमारेषा अत्यावश्यक सेवांसाठीच सुरू ठेवल्या जातील, असं देखील गोवा सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

  दरम्यान, लॉकडाऊन लागू करण्यात आला असला, तरी लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.

  ते म्हणाले की, “जर पुढचे काही दिवस लोकं घराबाहेर पडले नाहीत, तर आपण करोनाची साखळी तोडण्याच यशस्वी ठरू”. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर गोव्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.


  लॉकडाऊनदरम्यान गोव्यातील सर्व कसिनो आणि बार बंद राहणार आहेत. शिवाय, फक्त होम डिलीव्हरीसाठी रेस्टॉरंटचं किचन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये जेवायला बंदी असेल. राज्यात कुठेही अत्यावश्यक सेवांच्या व्यवहारांसाठी किंवा कामांसाठी बंदी नसेल.

  दरम्यान, गोव्यात आत्ता असलेल्या पर्यटकांना त्यांच्या हॉटेलबाहेर पडण्यापासून मनाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेपासून सोमवार ३ मे रोजी सकाळपर्यंत पर्यटकांना आपापल्या वास्तव्याच्या ठिकाणीच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  याशिवाय, गोव्यातील अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर होण्याची देखील शक्यता आहे. याआधीच कलंगुट आणि कँडोलिम या परिसरातल्या काही भागात कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत.

  दरम्यान, गोव्यात सध्या ऑक्सिजनचा कोणताही तुटवडा नसून जितकी गरज आहे, तेवढा ऑक्सिजन पुरवला जात आहे, असं देखील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे.