आमचं ऑफर लेटर मैदानात पडलेले नाही; देवेंद्र फडणवीसांचे मुश्रीफांना प्रत्युत्तर

भाजप प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, भाजपची ऑफर नाकारली म्हणून मला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी टाकल्या, असा खळबळजनक आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांच्या आरोपांनंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  गोवा : भाजप प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती, भाजपची ऑफर नाकारली म्हणून मला त्रास देण्यासाठी ईडीच्या धाडी टाकल्या, असा खळबळजनक आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

  दरम्यान हसन मुश्रीफ यांच्या आरोपांनंतर आता भाजपकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हसन मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

  फडणवीस नेमकं काय म्हणाले?

  मुश्रीफ यांना कोणतीही ऑफर देण्यात आली नव्हती असा खुलासा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘हसन मुश्रीफ यांना कोणी ऑफर दिली?  ऑफर घेऊन कुठेही फिरत थोडी असतो. आमचे ऑफर लेटर असेच मैदानात पडलेले नाहीत कोणालाही द्यायला, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

  पहिल्यांदाच अशी कारवाई

  किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एक व्यक्ती भ्रष्टाचाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करायला जातो आणि पोलीस त्याला अडवतात. अशाप्रकारची कायदा-सुव्यवस्था यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नसेल. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. त्यामुळे एकूणच जे काही चाललं आहे, ते भयानक आहे. पण भाजप काही थांबणार नाही. सातत्यानं भ्रष्टाचाराविरोधातील लढाई भाजप लढत राहिल. असं फडणवीस म्हणाले.

  तसेचं गृहमंत्र्यांनी केलेली कारवाई मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल, ही कारवाई थेट गृहमंत्र्यांनी केली असेल. पण माझं मत असं आहे की, मुख्यमंत्र्यांना कळाल्यानंतर त्यांनी दखल घेऊन अशी कारवाई थांबवली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहेृ.असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला आहे.