अखेर तिढा सुटला – गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची पुन्हा एकदा नियुक्ती, भाजपच्या बैठकीत शिक्कामोर्तब

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

    मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपनं विजय मिळवल्यानंतर गोव्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला जात होता. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून आलेले भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.

    मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असताना विश्वजित राणे यांनी दावेदारी केल्याने मुख्यमंत्रीपदाचा पेच निर्माण झाला होता. त्यामुळे निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी गोव्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत आणि राणे यांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं. या दोन्ही नेत्यांनी सावंत आणि राणेंशी मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर आज अखेर सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विश्वजित राणे यांनीच आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमतानं मंजूर करण्यात आल्याचं नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.