‘येथे’ कोविड केअर सेंटर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर

  • तालुका वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय व नोडल अधिकारी यांचे दुर्लक्ष

आमगाव. तालुक्यात प्रशासनाने कोरोनाबाधीत रुग्णांसाठी सुरु केलेल्या ७२  बेडच्या कोवीड केअर सेंटरमध्येही रुग्णांवर उपचार होत आहेत. आजही येथे शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या ठिकाणी आधीच तज्ञ डॉक्टरांबरोबर इतर कर्मचारी वर्गाचा तुटवडा आहे.  त्यामुळे  कंत्राटी स्टॉफच्या सहाय्याने येथील कारभार हातळला जात आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, नेर्सेसवर अतिरिक्त ताण येणे हे स्वाभावीकच आहे. परंतु असे असतांनाही येथील यंत्रणांमधील तालुका वैद्यकीय अधिकारी व तहसीलदार हे पाहणी करण्यासाठी १५-१५ दिवस येत नसल्याची माहिती मिळाली आहे.

सविस्तर वृत्त असे की, आमगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत आहे. या करिता कोविड केअर सेंटर  भवभूती महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृहात येथे सुरू करण्यात आले आहे, परंतु हे कोविड केअर सेंटरमध्ये सुविधांचा अभाव दिसून येत आहे. हे सेंटर  कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या भरोसे सुरू असून पाझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था वरच्या माळ्यावर करण्यात आली आहे व खाली रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.

या सर्व रुग्णांची तपासणी पासून तर कोरोना टेस्ट सुध्दा कंत्राटी कर्मचारी करीत असल्याचे आढळून आले आहे. तसेच  तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी शासनाच्या आदेशानुसार   उपकेंद्रातील CHO डॉक्टरांना कोविड तपासणीसाठी आठवड्यात ठरलेल्या दिवशी ड्युटी करण्याचे आदेश २७ जुलै ला काढण्यात आले आहेत परंतु काही डॉक्टर अजुन पर्यंत एकही दिवस कोविड सेंटर वर सेवा देण्यासाठी हजर झाले नाहीत. तरीसुद्धा तालुका वैद्यकीय अधिकारी व कोविड सेंटरचे नोडल अधिकारी  यांनी एक महिना लोटूनही कुठलीच कारवाही केलेली नाही.  आठवड्यातुन एक दिवस कोविड सेंटरवर सेवा न देऊ शकणाऱ्या डॉक्टरांवर कारवाहीची मागणी केली जात आहे.  या कोविड केअर सेंटर वर मदतनीस म्हणून भूमी अभिलेख कार्यलयातील परिचरांची नियुक्ती प्रशासनाने केली आहे परंतु कोरोनाच्या भीतीपोटी हे परिचर  सेंटरमध्ये न राहता बाहेर फिरतांना आढळून आलेत.  त्यामुळे बाधित रुग्णांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा त्रास सहन करावा लागत असल्याचे बाधित रुग्णांकडून सांगण्यात आले आहे.

पिण्यासाठी गरम पाण्याची व्यवस्था नाही, महिला पुरुष स्वतंत्र शौचालय व्यवस्था नाही, वापरलेल्या किट कित्येक दिवस तसेच पडून राहतात त्यानंतर डिस्ट्रॉय करिता नागपूरला पाठविण्यात येतात.  संशयित रुग्णांची तपासणी इथेच करण्यात येत असल्याने संशयित रुग्ण कोरोना पॅसिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात येऊ शकतो असे अनेकांचे मत आहे.  असे असूनही कंत्राटी डॉक्टर, नर्स, औषधी वितरक, इत्यादी आपली सेवा देत आहेत. परंतु वैद्यकीय अधिकारी १५-१५ दिवस भेट देत नसल्याची माहिती माहिती मिळाली आहे तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणून तहसीलदार सुध्दा क्वचितच भेट देत असल्याने रुग्णांच्या बाबतीत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दाखल रुग्णांकडून केला जात आहे.