मजुरांची मागणी : साहेब, रोजगार हमीचे पैसे जमा करा !

परिसरासह अनेक गावात शासनाच्या रोजगार हमी योजनेचे काम झाले, तर काही गावात सुरू आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाटाचे बांधकाम करून महिना लोटला. मात्र, अद्याप मजुरांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे मजुरांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

    नवेगावबांध (Navegaonbandh).  परिसरासह अनेक गावात शासनाच्या रोजगार हमी योजनेचे काम झाले, तर काही गावात सुरू आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पाटाचे बांधकाम करून महिना लोटला. मात्र, अद्याप मजुरांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्यामुळे मजुरांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. याकडे तातडीने लक्ष घालून मजुरीची रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट आहे. त्यातच खरीप हंगामात खर्चावर आधारित उत्पादन झाले नाही. वर्षभर हाताला काम नव्हते. अशात नागरिकांची कमालीची ससेहोलपट होत आहे. दीर्घ काळानंतर मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात आले. कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे, याकरिता पाटचाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. काम सुरू होऊन तीन आठवड्यांचा काळ लोटला. मात्र, अद्याप मजुरी मिळाली नाही. आधीच कोरोनाचा कहर आणि त्यात पुन्हा महागाईची झळ अशा अवस्थेत केलेल्या कामाचा मोबदला मिळाला नसल्यामुळे शेतकरी आणि मजूर वर्गाची चांगलीच होलपट होत आहे.

    मजुरांना चालू कामाची मजुरी मिळाली नाही. शिवाय यापूर्वी केलेल्या कामाची मजुरी देखील मिळाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शास्वत आणि हमी असलेल्या कामाचीच मजुरी वेळेवर मिळत नसेल तर मजुरांनी दाद कुणाकडे मागावी, असा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे. संबंधित विभागाने थकीत मजुरीची रक्कम खात्यावर जमा करावी, अन्यथा वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याचे म्हणणे मजुरांचे आहे.