कोरोना काळातही पळसगाव शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या; लोकसहभागातून रंगरंगोटी व नाविण्यपूर्ण वाचनकुटी

जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव/ राका येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षकांनी सुंदर रंगरंगोटी करून व कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे या शाळेची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा आहे.

    सडक अर्जुनी (Sadak Arjuni).  जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पळसगाव / राका येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळेतील शिक्षकांनी सुंदर रंगरंगोटी करून व कोरोना काळात विविध शैक्षणिक उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला आहे. त्यामुळे या शाळेची जिल्ह्यात सध्या चांगलीच चर्चा आहे. एकीकडे शाळा बंद असून शिक्षकांनी फावल्या वेळेचा सदुपयोग करत शाळेच्या भिंती बोलक्या केल्या.

    पळसगाव / राका हे 1752 लोकवस्तीचे गाव. येथे पहिली ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा असून मुख्याध्यापक एस. आर. फूंडे ,पदवीधर शिक्षक संदीप तिडके, भास्कर नागपुरे, सहाय्यक शिक्षक नितीन अंबादे व श्रीमती एस. टी. कापगते यांनी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून कोरोणा सारख्या भीषण परिस्थितीत विद्यार्थ्यांचा शैक्षणीक व संगणकीय विकास घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तंत्रस्नेही शिक्षक भाष्कर नागपूरे यांच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नामूळे इयत्ता 5 ते 7 पर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी संगणक चांगल्या प्रकारे हाताळतात. फाईल तयार करणे, संगणकावर टायपिंग करणे, मोबाईल संगणकाला कनेक्ट करणे, मोबाईल प्रिंटरला कनेक्ट करून प्रिंट काढणे यासारखी कामे विद्यार्थी सहजपणे करतात. तीन महिन्यांपूर्वी शाळेत रुजू झालेले पदवीधर शिक्षक संदीप तिडके यांनी आपल्या संकल्पनेतून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, गावकरी व शाळेतील सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने लोकसहभागातून शाळेला आकर्षक रंगरंगोटी द्वारे नवे रुप प्रदान करण्यात महत्वाची भूमिका निभावली.

    विविध सामाजिक प्रबोधन दर्शक तक्ते व शैक्षणिक स्वरूपाचे चार्ट भिंतीवर काढून विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यास ‘बोलकी शाळा’ तयार केली आहे. शाळा संपूर्ण डिजिटल असून दोन प्रोजेक्टर संच शाळेत उपलब्ध आहेत. शाळेबाहेरची शाळा, स्वाध्यायमाला यासारखे ऑनलाईन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. संस्कार मूल्यासह विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, शाळेत प्रसन्न वातावरण निर्माण व्हावे व विद्यार्थ्यांना शाळा आपली वाटावी यासाठी आकर्षक स्वरूपाची वाचन कुटी कुसूम कापगते यांच्या आर्थिक सहकार्यातून शाळेत तयार करण्यात आली असून विद्यार्थी अतिशय मनमोकळेपणाने वाचन कुटीच्या सानिध्यात शिक्षण घेतात. शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी करून शाळा परिसर आकर्षित केला असून गावकऱ्यांच्या मदतीने अनेक भौतिक सुविधा शाळेत तयार करण्यात आल्या आहेत.

    सोबतच चौदाव्या वित्त आयोगामधून मागील दोन वर्षांमध्ये शाळेत मॉडेल शौचालय तयार करण्यामध्ये ग्रामपंचायतचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. शाळेच्या विकासासाठी गटशिक्षणाधिकारी श्री सरयाम, केंद्रप्रमुख डी. झेड. लांडगे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाष्कर मानकर, उपाध्यक्ष धनराज येरपुडे, ग्रामपंचायत सरपंच भारती लोथे, उपसरपंच सुनील चांदेवार, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुभाष कापगते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक संघामधील सर्व सदस्य तथा सर्व पालकांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.