चुलबंद नदीच्या घाटातून वाळूचा अवैध उपसा जोमात; महसूल विभागाचे दुर्लक्ष : दररोज लाखोंचा महसूल पाण्यात

सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदी शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. या नदीच्या पाण्याच्या भरवशावर शेकडो शेतकरी उत्पादन घेतात. नदी पात्रातील पाणी साचून राहावे, याकरिता शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बंधारे बांधले.

    गोंदिया (Gondia).  सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदी शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. या नदीच्या पाण्याच्या भरवशावर शेकडो शेतकरी उत्पादन घेतात. नदी पात्रातील पाणी साचून राहावे, याकरिता शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बंधारे बांधले. मात्र, नदीपात्रात वाळूच शिल्लक राहणार नसल्याने जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढणार हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दररोज नदीच्या सौंदड घाटातून रेतीचा उपसा सुरू असल्याने शासनाला चाखो रुपयांचा महसूल देखील बुडत आहे.

    सडक अर्जुनी तालुक्यात हजारो बांधकाम सुरू आहे. शासकीय बांधकामांशिवाय यावर्षी घरकुलांचे बांधकाम देखील मोठ्या प्रमाणात मंजूर झाले. घरकुलांचे बांधकाम जोमात सुरू आहे. मात्र, तालुक्यातील रेती घाटांचा यावर्षी लिलाव झाला नसल्याने बांधकाम करताना मोठी अडचण येत आहे. याचा फायदा तालुक्यातील रेती माफियांनी घेतला आहे. चुलबंद नदीच्या पात्रातून काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन रेतीचे अवैधरित्या उत्खनन करण्यात येते. ती रेती चार ते पाच हजार रुपये ट्रॉली प्रमाणे विक्री करण्यात येत आहे. रात्रंदिवसच्या उत्खननामुळे नदीच्या पात्रात खोल खड्डे झाले आहेत.

    एकीकडे शासन नदीच्या पात्रात बंधारे तयार करून पाणी मुरविण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे प्रशासनातीलच काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगणमताने रेतीचे उत्खनन करून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेला फाटा देण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाची योजना फोल ठरत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेती तस्करीचे रॅकेट सक्रीय झाले आहे. या प्रकाराकडे मात्र कुणाचेही लक्ष नाही. कारवाईच्या नावावर काही वाहन पकडले जातात. वाहन पकडल्याच्या काही वेळानंतरच दलालांमार्फत तोड करून वाहन सोडले जाते.

    एखादा वाहन चालक पळून गेल्यासच त्याच्यावर कारवाई करण्यात येते. मर्जीत नसणाऱ्या तस्करांवर मात्र कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे आत्तापर्यंत झालेल्या कारवायांतून दिसून आले. सध्या कोरोना विषाणूचे संक्रमण तोडण्याकरिता लॉकडाऊन घोषित करण्यात आले. सर्व कामधंदे बंद आहेत. मात्र रेती उपसा आणि वाहतूक दिवसरात्र सुरू आहे. यातून रग्गड कमाई करण्याचे साधन तस्करांना मिळाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.