चोपा परिसरातील मोबाईल नेटवर्क नॉट-रिचेबल; शासकीय ऑनलाईन कामे ठप्प

गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाईल कंपन्यांनी प्रसार, प्रचारच्या माध्यमातून गावागावांत नेटवर्कचे जाळे पसरविले आहे. परंतु हेच नेटवर्क आता नॉट रिचेबल झाले असल्याने चोपा परिसरातील ऑनलाईन कामे ठप्प पडली आहेत.

    गोरेगाव (Goregaon). तालुक्यातील ग्रामीण भागात मोबाईल कंपन्यांनी प्रसार, प्रचारच्या माध्यमातून गावागावांत नेटवर्कचे जाळे पसरविले आहे. परंतु हेच नेटवर्क आता नॉट रिचेबल झाले असल्याने चोपा परिसरातील ऑनलाईन कामे ठप्प पडली आहेत. चोपा परिसरातील गावात कोणत्याही मोबाईल कंपनीचे नेटवर्क काम करत नाही. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, बँक, शाळा, कालेज , शासकीय कार्यालयातील कामकाजाची गती कासवगतीने होत आहे.

    सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. तसेच कालीमाटी, तिल्ली, मोहगाव, हिराटोला, तुमसर या गावात मोबाईल नेटवर्क काम करत नाही. या परीसरात वोडाफोन, आयडिया, जिओ, बीएसएनएल, एयरटेल या मोबाईल कंपन्यांचे ग्राहक आहेत. मोबाईल कंपन्यांनी टॉवर क्षमता मर्यादित ठेवल्याने ग्राहकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी ग्रामीण भागातून शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. चोपा या गावी ग्रामीण बँक, को-ऑपरेटिव्ह बँक, वाघाये पाटील महाविद्यालय, रविंद्र कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, शासकीय कार्यालये कार्यरत आहेत.

    त्यांना नेटवर्क नसल्याने शासकीय कामे वेळेवर पूर्ण करता येत नाही. परंतु या मोबाईल कंपन्या समस्या सोडविण्याऐवजी ग्राहक वाढविण्यासाठी धडपड करत आहेत. मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांच्या समस्या लक्षात घेता चोपा परिसरातील गावांत चांगल्या दर्जाचे नेटवर्क उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.