सडक अर्जुनी-शेंडा मार्ग जीवघेणा, संपूर्ण रस्ता उखडला; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

सडक अर्जुनी ते शेंडा मार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. सध्या रेंगेपार पहाडी ते खोलढोडीपर्यंत ६ किमी रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे.

    सडक अर्जुनी (Sadak Arjuni).  सडक अर्जुनी ते शेंडा मार्गाचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. सध्या रेंगेपार पहाडी ते खोलढोडीपर्यंत 6 किमी रस्त्याचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. जागोजागी गिट्टी व मुरूमाचे ढिगार पडले आहेत. त्यामुळे हा रस्ता येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.

    नागपूर येथील आताशा आशीर्वाद बिल्डर्स या कंपनीकडे सदर रस्त्याचे काम आहे. या कामाची अंदाजे किंमत 22 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या कामाची मंजुरी 14 नोव्हेंबर 2018 ची असून काम संपविण्याचा अवधी 13 नोव्हेंबर 2020 पर्यंत होती. मात्र, एकाच रस्त्याला वारंवार खोदणे व वारंवार बुझविणे असाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. 6 किमी रस्त्याचे बांधकाम सुरू करण्याअगोदर याच रस्त्यावर 24 नाल्या खोदण्यात आल्या होत्या. त्यावेळी अनेक अपघात घडले होते. त्यावेळी सुद्धा कंत्राटदाराने मनमर्जी काम सुरूच ठेवले होते. या रस्ता बांधकामातही मनमर्जी सुरू असल्याने जनतेच्या पैशांची लूट होत असल्याचे बोलले जाते.

    रस्त्यावर ठिकठिकाणी अस्ताव्यस्त गिट्टी व मुरूमाचे ढिगार असल्याने कित्येक प्रवाशांची वाहने पंक्चर होत आहेत. अपघात घडून जखमी होत असून हा रस्ता अतिशाप ठरत आहे. सदर रस्त्याच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग (सावंगी) कडून तांत्रिक अधिकारी नेमले आहेत. परंतु, रस्त्याची अवस्था बघितली तर सर्वत्र कामावर कोणतीही देखरेख नसावी असेच वाटते. शेंडा परिसरात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी अनेक नेतेमंडळी या रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र, त्यांनीही या रस्त्याच्या बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने लोकांच्या मनात रोष आहे.

    सदर रस्त्याचे बांधकाम आजघडीला जसे सुरू आहे तसेच राहिले तर बांधकामाला 4 वर्षही कमी पडतील यात अतिशयोक्ती नाही. नवीन रस्त्याचे बांधकाम करताना प्रवाशांना ये-जा करण्यासाठी एका बाजूने बांधकाम तर दुसरा मार्ग मोकळा ठेवायला पाहिजे होता. परंतु, तसे न करता संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.