खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बियाणांचा पुरवठा करा; पालकमंत्री नवाब मलिक

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कृषी विभागाने नियोजन करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

    गोंदिया (Gondia).  खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना रासायनिक खते, बी-बियाणे आणि कीटकनाशके सहज उपलब्ध झाली पाहिजे. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष देऊन कृषी विभागाने नियोजन करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खतांचा पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिले.

    २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात पालकमंत्री मलिक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व तयारीची आढावा सभा आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे व सहेषराम कोरोटे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे, पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    पालकमंत्री मलिक म्हणाले, कृषी विभागाने समन्वय साधून रासायनिक खते, बी-बियाणे, शेतीशी संबंधित अवजारे, फवारणी यंत्रे व कीटकनाशके आदी बाबींची शेतकऱ्यांना उपलब्धता करून देताना पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा सहज आणि सुलभ पद्धतीने कसा काढता येईल, यादृष्टीने नियोजन करावे. पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन प्रलंबित असतील त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीने तातडीने वीज कनेक्शन द्यावे. सामान्य शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वाटप करावे.

    खरीप हंगाम 2021-22 करीता जे नियोजन केले आहे त्याची कृषी विभागाने प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. रब्बी उन्हाळी हंगामात उत्पादन होणारे धान खरेदी करण्याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. सदरचे धान खरेदी करण्यासाठी गोदामांची व्यवस्था अपुरी असल्यामुळे याबाबत शासन स्तरावर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सुचित केले. मागील खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतला होता त्यापैकी अनेक शेतकरी पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित आहेत.

    जिल्ह्यातील 2 लाख 20 हजार 246 हेक्टर क्षेत्रावर पिके घेण्याचे नियोजन आहे. भात पीक 1 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्याचे प्रस्तावित आहे. 2021-22 या वर्षात 300 कोटी रुपये खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडून प्रस्तावित आहे. -- घोरपडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी