महिला वाहकाच्या हातातच तिकिट मशीनचा स्फोट; महिलेकडून पोलिसात तक्रार दाखल

कल्पना मेश्राम परतीच्या प्रवासासाठी 'ईटीआयएम' मशीनमध्ये रूट बदल करीत असताना अचानक तिकीट मशिनमध्ये स्फोट झाला. या स्फोटात कल्पना मेश्राम यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

    गोंदिया (Gondia) : गोंदियात बस स्टॅण्डवर एका महिला वाहकाच्या हातात असलेल्या तिकिट वेंडिंग मशीनचा विस्फोट होवून महिला वाहक गंभीर जखमी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

    गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी आगारातून आलेल्या एसटी बसमधील महिला वाहक कल्पना मेश्राम परतीच्या प्रवासासाठी ‘ईटीआयएम’ मशीनमध्ये रूट बदल करीत असताना अचानक तिकीट मशिनमध्ये स्फोट झाला. या स्फोटात कल्पना मेश्राम यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी कल्पना मेश्राम यांनी गोंदियाच्या रामनगर पोलिस ठाण्यात मशीन पूरवणाऱ्या ट्रायमॅक्स या कंपनी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

    एसटी महामंडळात तिकिट वेंडिंग मशीनचा अनेक वाहकांना त्रास सहन करावा लागला आहे. मशीन मधून प्रिंट न निघणं, मशीन अचानक बंद पडणं, तर कधी चुकीच्या तिकीट प्रिंट होणे अश्या अनेक तक्रारी वाहकांनी एसटी महामंडळाकड केल्या. पण याची कोणतीही दखल महामंडळाकडून घेण्यात आलेली नाही. मशीन आऊट डेटेड होऊनही बदलून दिलेल्या नाहीत, यातूनच हा प्रकार घडल्याचं बोललं जात आहे.