उघड्यावर थुंकणाऱ्यांना दणका देण्याची गरज; जिल्ह्यात गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक

शिंकल्याने तसेच थुंकल्याने आपल्या लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेवून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला असताना उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती.

    गोंदिया (Gondia). शिंकल्याने तसेच थुंकल्याने आपल्या लाळेतून उडणाऱ्या तुषारांपासून कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतो. ही बाब लक्षात घेवून कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी व सुरक्षेचा उपाय म्हणून नागरिकांना तोंडावर मास्क लावण्यास सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव बळावला असताना उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. मात्र, आता कारवाई बंद असल्याने अशा बेजबाबदार नागरिकांना रान मोकळे असून सार्वजनिक जागांवर ते बिनधास्त थुंकत असताना दिसत आहेत.

    देशात कोरोना शिरकाव झाल्यानंतर मागील वर्षी मार्च माहिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर अवघ्या जगातच नागरिकांना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. बाधित व्यक्तीच्या शिंकल्याने तसेच बोलताना वा थुंकल्याने तोंडातून निघाणाऱ्या लाळेतील तुषार हवेत उडतात व त्याच्या संपर्कात येणारी व्यक्तीही बाधित होऊ शकते. यासाठी तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करून उघड्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई केली जात होती. परिणामी याला थोड्या प्रमाणात प्रतिबंध लागला होता. कोरोना बाधितांची संख्या कमी होताच जिल्हा प्रशासनाकडून पूर्वी होती ती सक्ती शिथिल करण्यात आली आहे.

    याचा गैरफायदा काही बेजबाबदार नागरिक घेत आहे. कित्येक नागरिक सार्वजनिक स्थळी उघड्यावरच सर्रास थुंकताना दिसून येत आहेत. मात्र, राज्यात पुन्हा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. परिणामी, अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातही दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता जिल्हा व पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

    गुटखा खाणाऱ्यांमुळे सर्वाधिक धोका
    दिवसभर तोंडात गुटखा भरून ठेवणारे जागा मिळेल तेथे थुंकतात. हा प्रकार अत्याधिक धोक्याचा असून अशात एखाद्या बाधितापासून कित्येकांना कोरोना व अन्य संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता आता जिल्हा प्रशासनाने पुन्हा उघड्यावर थुंकणाऱ्यांना चांगलाच दणका देण्याची मागणी शहरतील सुज्ञ नागरिक करीत आहेत.