रेतीमाफिया बिनधास्त, रेतीची चोरी काही केल्या थांबेना; पोलिस अधीक्षक लक्ष देतील काय ?

गोंदिया जिल्ह्यातील अवैध रेती आळा बसावा, यासाठी पोलिस अधीक्षकांनी रेतीमाफियांना तडीपार केले आहे. यात सडक अर्जुनी तालुक्यातील तीन रेती माफियांचा समावेश आहे; मात्र, रेतीमाफिया तडीपार असूनसुद्धा रेतीचा उपसा थांबता थांबेना. तालुक्यात अवैध रेती चोरी जोमात सुरू आहे. याकडे पोलिस अधीक्षक साहेब लक्ष देणार काय? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

  सडक अर्जुनी (Sadak Arjuni).  गोंदिया जिल्ह्यातील अवैध रेती आळा बसावा, यासाठी पोलिस अधीक्षकांनी रेतीमाफियांना तडीपार केले आहे. यात सडक अर्जुनी तालुक्यातील तीन रेती माफियांचा समावेश आहे; मात्र, रेतीमाफिया तडीपार असूनसुद्धा रेतीचा उपसा थांबता थांबेना. तालुक्यात अवैध रेती चोरी जोमात सुरू आहे. याकडे पोलिस अधीक्षक साहेब लक्ष देणार काय? असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

  तालुक्यातील चिखली, खोबा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील परसोडी, पांढरवाणी, नवेगावबांध ते कोहमारा या मार्गावर मोठ्याप्रमाणात सिमेंट रस्ते, पुलाचे बांधकाम चालू आहेत. या कामासाठी नवेगावबांध येथे पाच-सहा महिन्यांपासून एक कंपनीमार्फत मिक्सर प्लाँट सुरू आहे. या मिक्सर प्लाँटमध्ये मोठ्याप्रमाणात रेतीचा वापर केला जात असल्याची चर्चा जोमात सुरू आहे. 2018 पासून रेतीघाट बंद होते. परंतु, या कामावर रोज रात्रीला 15 ते 20 टिप्परच्या सहाय्याने अवैधरित्या रेती आणली जात होती. अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परकडे कोणतेही अधिकारी ढुंकूनही पाहत नाहीत. मिक्सर प्लाँटवर अवैधरित्या येणारी रेती शासकीय यंत्रणेच्या आशीर्वादाने येते. महसूल विभाग व पोलिस विभागाकडे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचे नंबर दिले असल्याचे दबक्या आवाजात दलाल सांगतात.

  एका टिप्पर मागे 10 हजार रुपये द्यावे लागते. कधी वाहत तपास झाल्यास जून्या रॉयल्टीची पास दाखिवल्या जाते. त्यामुळे अधिकारीसुद्धा आपले संबंध जोपासत त्या रॉयल्टीची ऑनलाईन तपासणी करत नाही. एकंदरीत शासकीय यंत्रणेचा आशीर्वाद आहे की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. महसूल विभागाने अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर दक्षता समिती गठित केली. त्या दक्षता समितीमध्ये सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, पोलिस विभाग, ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समितीचे सदस्यांचा समावेश आहे.

  एवढ्या लोकांची नियंत्रणा ठेवण्यासाठी दक्षता समिती गठित असूनसुद्धा समिती सदस्यांच्या आशीर्वादाने चोरट्याने मार्गाने रेती व्यवसाय सुरू आहे. या सर्व प्रकरणात अधिकारी व लोकप्रतिनिधी या कामात गुंतले असल्याने कारवाई नेमकी करायची कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रेती माफियांना तळीपार करण्यात आले तरीसुध्दा अवैघ रेताचा उपसा थांबता थांबेना. त्यामुळे याकडे पोलिस अधीक्षक साहेब लक्ष देणार काय? असा सवाल नागरिकांना पडला आहे.

  खंडणी देऊन निर्भयपणे काळाबाजार
  पालांदूर, दिघोरी, बोंडगावदेवी, चान्ना/बाक्टी, नवेगावबांध, सौंदड, चिखली या मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक केली जात आहे. तेथून नवेगावबांधपर्यंत 12-15 हजार रुपये खंडणी देऊन निर्भयपणे रेतीचा काळाबाजार सद्य:स्थितीत सुरू आहे. रेती तस्करांना स्थानिक दलाल व महसूल अधिकारी, कर्मचारी, राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याचे नवेगावबांध, कोहमारा चौरस्त्यावर, पानटपरीवर चर्चा नेहमीच रंगतात.

  चोरीच्या रेतीला सोन्याचे भाव
  सडकअर्जुनी तालुक्यातून नदी गेली असली तरी रेतीचे भाव गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील रेती घाट सुरू झाले आहेत. अशात त्या रॉयल्टीचा वापर इकडे केला जात आहे. 5 ब्रास रेती चक्क 35 हजार रुपयाला विक्री केली जात आहे. त्यामुळे चोरीच्या रेतीला आता सोन्याचे भाव आले आहेत.