राज्यमार्ग ठरतोय जीवघेणा; चिखली गावात धुळीचे साम्राज्य, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

तालुक्यातील कोहमारा ते अर्जुनी मोरगाव राज्य मार्गाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. बांधकाम करताना रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नाही. परिणामी, चिखली गावासह आदी गावात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे हा राज्य मार्ग जीवघेणा ठरत आहे.

  सडक अर्जुनी (Sadak Arjuni).  तालुक्यातील कोहमारा ते अर्जुनी मोरगाव राज्य मार्गाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. बांधकाम करताना रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नाही. परिणामी, चिखली गावासह आदी गावात धुळीचे साम्राज्य आहे. त्यामुळे हा राज्य मार्ग जीवघेणा ठरत आहे.

  कोहमारा ते अर्जुनी मोरगाव मार्गावरील चिखली येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील दोन वर्षांपासून या मार्गाचे बांधकाम मंदगतीने सुरू आहे. याच मार्गावर सिमेंट नालीचे बांधकाम व सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अर्धवट करण्यात आले असून सध्या या ठिकाणातील बांधकाम बंद आहे. तर झालेल्या बांधकामावर पाणीसुद्धा टाकले जा नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदरीत बांधकाम निकृष्ट दर्जाचे होणार यात शंका नाही. या मुख्य मार्गाने मोठे अवजड वाहन धावतात. त्यामुळे रस्त्यावरील संपूर्ण धूळ उडते. ही धूळ नागरिकांच्या घरात व नाका तोंडात जाते. या परिसरात दाट लोकवस्ती असल्याने नागरिकांना विविध आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  संबंधित कंत्राटदाराने या मार्गावरील धुळ हवेत उडू नये म्हणून या मार्गावर पाणी मारण्याची गरज आहे, मात्र असे होताना दिसत नाही. एवढेच नाही तर या मार्गाचा वापर टोल चुकविण्यासाठीसुद्धा केला जात आहे. याच मार्गाने नवीन वाहन मोठ्या प्रमाणात मुंबईवरून जिल्ह्यात दाखल होतात. ही वाहने चंद्रपूर, गडचिरोली मार्गाने गोंदियात दाखल होतात तर याच मार्गाने मध्यप्रदेश राज्यात जातात. लोकवस्तीच्या मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असून स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

  या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत. तर अपघातात एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचेही गावकरी सांगतात. या मार्गाचे काम चांगले व्हावे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी धडपड करतात. मात्र, शासकीय यंत्रणेला आपल्या कर्तव्याचे विसर पडल्याचे दिसत आहे. प्रशासन कोट्यवधी रुपयांचा निधी लोककल्याणासाठी खर्च करतो. मात्र, कमिशनखोरीमुळे कमिशन काढण्यापुरतेच बांधकाम टिकते. चिखली, कणेरीसह अन्य मार्गावरील गावांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. तर गावातील नागरिकांना मुख्य मार्गावर निघण्यासाठी बायपास मार्ग तयार करण्याची अत्यंत गरज असतानासुद्धा बायपास मार्ग तयार करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना मार्ग ओलांडताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गाचे काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

  कोहमारा-अर्जुनी मोरगाव राज्यमार्गावर माझा अपघात घडला. यात मी थोडक्यात बचावलो. असे अन्य लोकांसोबतही होवू शकतो. त्यामुळे या मार्गाचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे. — सुभाष मेश्राम, पोलिस पाटील, चिखली

  वडसा-कोहमारा मार्गाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. काम अत्यंत मंदगतीने होत आहे. त्यामुळे प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम त्वरित करण्यात यावे. — दीपक वैद्य, सरपंच, कणेरी/राम

  राज्यमार्गाला लागून माझे घर आहे. या मार्गावरून अवजड वाहन ये-जा करतात. त्यामुळे मोठ्याप्रमाणात धूळ उडते. ती नाका-तोंडात जाते. त्यामुळे मुलांना आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर पाणीसुद्धा टाकण्यात येत नाही. — उत्तमराव उके, चिखली