gondia gmc

गोंदिया. संपूर्ण जगासह भारतालाही कोरोना (कोविड- 19) विषाणू संसर्गाने कवेत घेतले आहे. या विषाणूचा नायनाट करून नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासन शक्‍ती पाणाला  लावून काम करत आहे. वैद्यकीय आणि पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जीव तोडून काम करत आहेत. मात्र, त्यांच्याच जिवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा प्रकार गोंदियात समोर आला आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची ‘तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीपीई कीटची मागणी केल्यामुळे औषध विभागाचे प्रमुख आणि अधीक्षक यांनी चक्क डॉक्टरांना कीटची मागणी केल्यास निलंबित करण्याची धमकी दिल्यामुळे आता हा वाद चव्हाट्यावर आला आहे. उल्लेखनीय असे की, गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला हस्तांतरित करण्यात आला आहे. या रुग्णालयाची रुग्णसेवा वैद्यकीय महाविद्यालयाकडे आहे. केटीएस हे जिल्हास्तरीय रुग्णालय असल्याने येथे दिवसाकाठी शेकडो रुग्ण येतात. या रुग्णांची गेल्या काही वर्षांत हेळसांड होत  असल्याचे खुद्द राजकारणी मंडळीने कबूल केले आहे. त्यातच आता विषाणूचा संसर्ग असल्याने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर  मंडळीवर अधिकच भार आहे. येथे कार्यरत विभागप्रमुख आणि प्राध्यापक नागपूर येथे आहेत. जे डॉक्टर गोंदिया मुख्यालयी मुक्कामी आहेत. त्यांच्याच खांद्यावर रुग्णसेवेची जबाबदारी आहे. या रुग्णाळयात १२०० पीपीई कीटची आवश्यकता आहे. मात्र वैद्यकोय महाविद्यालय प्रशासनाने कीट पुरवून दिलेल्या नाहीत. परिणामी डॉक्टरांना मुठीत जीव घेवून रुग्णसेवा करावी लागत आहे.