तिरोड्याच्या चंद्रभागा स्मशानघाटाला विकासाची प्रतीक्षा; इमारतींच्या भिंती व कॉलमला भेगा

येथील चंद्रभागा नाक्यावर तिरोडा शहरातील मुख्य स्मशानघाट आहे. येथील परिसर रोपटे व फुलझाडांनी शोभिवंत करण्यात आले असले तरी जेथे प्रेतांवर अग्निसंस्कार केले जाते त्या स्मशान इमारतींच्या भिंती व कॉलमला भेगा पडल्या आहेत. छत सुद्धा जीर्ण झालेले आहेत.

    तिरोडा (Tiroda). येथील चंद्रभागा नाक्यावर तिरोडा शहरातील मुख्य स्मशानघाट आहे. येथील परिसर रोपटे व फुलझाडांनी शोभिवंत करण्यात आले असले तरी जेथे प्रेतांवर अग्निसंस्कार केले जाते त्या स्मशान इमारतींच्या भिंती व कॉलमला भेगा पडल्या आहेत. छत सुद्धा जीर्ण झालेले आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा स्मशानघाट आपल्या विकासाच्या प्रतीक्षेत असून आजही विकासाची वाट पाहत आहे.

    जन्म आणि मृत्यू, जीवन आणि मरण ही निरंतर चालणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. जीवनाचे वास्तव मृत्यू आहे तर मृत्यू हा जीवनाचा शेवट आहे. आणि ज्याचा मृत्यू होतो त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्याचे ठिकाण म्हणजे स्मशानघाट. तिरोडा शहरातील मुख्य स्मशानघाट म्हणून चंद्रभागा स्मशानभूमीची ओळख आहे. येथील प्रवेशद्वार सुसज्ज असून प्रेतांना अग्नी देण्यासाठी येथे लाकडांची सुविधा सुद्धा आहे. तसेच नगर परिषदेच्या स्वर्गरथाने येथे अग्नी देण्यासाठी प्रेतांना आणले जाते.

    चंद्रभागा स्मशानघाट परिसरात भगवान शिव यांचे मंदिर आहे. बाजूलाच रोपटे व फुलझाडांनी परिसर शोभिवंत करण्यात आले आहे. प्रेत घेऊन येणार्यांसाठी बसण्याची व पाण्यासाठी बोअरवेलची सोय सुद्धा आहे. परंतु, जेथे प्रेतांवर अग्निसंस्कार केले जाते त्या इमारती आता जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींचे ऑडिट होणे गरजेचे आहे. भिंती तथा कॉलमला मोठ्या भेगा पडल्या आहेत. तेथील गिट्टी व सीमेंट उखडले आहे. छत सुद्धा जीर्ण झाले असून इमारत जमीदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धोका होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. संबंधित प्रशासनाने लक्ष देवून येथील इमारतींची दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे.