महिलांची पाण्यासाठी पायपीट; जनावरांना पाणी मिळणे झाले कठीण

तिरोडा तालुक्यातील धामदी, उमरी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने पशुपालक सुद्धा संकटात आले आहे.

    बिरसी फाटा (Birsi Fata).  तिरोडा तालुक्यातील धामदी, उमरी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागत आहे. जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने पशुपालक सुद्धा संकटात आले आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाने कसलीच उपाययोजना केली नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

    गावातील नळाला पुरेसा पाणी येत नसून गावालगतचा नाला पुर्णत: कोरडा पडला आहे. या प्रकाराकडे संबंधित शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांना सध्या पाणीटंचाईच्या भयंकर संकटाचा सामना करावा लागत आहे. धादरी, उमरी हे एकाच गटग्रामपंचायतमध्ये येणारे दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्यामध्ये एक नाला वाहतो. नाल्याच्या एकीकडे धादरी तर दुसरीकडे उमरी हे गाव उन्हाळा सुरूवात झाली असून गावात भीषण पाणीटंचाई आहे. नळ योजनेचे पाणी केवळ पाच ते दहा मिनिटे सुरू राहते. एवढ्याशा पाण्यात गावकऱ्यांचे दैनंदिन कार्य पूर्ण होत नाही. पिण्याचे पाणी कुठून आणणार अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जनावरांसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

    पाण्यासाठी जेसीबीने केले खड्डे
    दोन्ही गावांच्यामध्ये असलेल्या नाला पूर्णत: कोरडा पडला आहे. त्यात पाणी नसल्यामुळे आता जेसीबीने नाल्याच्या पात्रात खोदकाम करून पाण्याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले असून काही खड्डयांना पाणी लागले आहे. ते पाणी आता गावकरी घेऊन जात आहेत. असे दूषित पाणी वापरण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. ग्राम धादरी, उमरीच्या ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळू शकेल व त्यांची पाणी टंचाईची समस्या मार्गी लावावेत, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.