postpartum depression

अनेकदा पोस्टपार्टम डिप्रेशनचा(postpartum depression) त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांची(problems of woman) व्यथा मूकच राहते. त्यांची मनोवस्था(mental stage) कुणाच्याही लक्षात येत नाही, कुणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच एक समाज म्हणून अशा स्थितीतून जाणाऱ्या स्त्रिया ओळखणे आणि त्यांना या मन:स्थितीसाठी योग्य ते उपचार मिळवून देण्यास मदत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.

  एक मूल वाढवायला संपूर्ण गावाची गरज लागते असे बरेचदा म्हटले जाते. खऱ्या अर्थाने पाहायचे झाले तर ही म्हण बाळाला मोठे करण्याच्या बाबतीत जितकी लागू पडते तितकीच ती मातेलाही लागू पडते. प्रसूतीवेदना आणि बाळाला जन्म देणे हे स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठे आणि महत्त्वाचे क्षण असतात.

  प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नेहा कर्वे सांगतात की, या काळात शरीरातील संप्रेरकांच्या पातळीत होणारे बदल, मानसशास्त्रीय आणि जैविक बदल इतके टोकाचे असतात की त्यामुळे ती प्रचंड मोठ्या शारीरिक व भावनिक स्थित्यंतरातून जाते. हे सर्व बदल शरीराच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम करतात. हे सर्व बदल शरीराच्या केंद्रीय मज्जासंस्थेवर परीणाम करतात. प्युरपेरियम काळात (प्रसूतीनंतर सहा महिन्यांचा काळ) स्त्रीची अवस्था अत्यंत असहाय असते, त्यातच नियंत्रण गमावल्याची भावना तिच्या मनात घर करते. नवमातेच्या इतर व्यक्तींशी असलेल्या संबंधांमध्ये, तिच्या कौटुंबिक विश्वामध्ये प्रचंड बदल घडून येतात. त्यामुळे काही स्त्रियांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात काही अडचणी येतात.  इतर काही स्त्रियांच्या मन:स्थितीमध्ये होणारा बिघाड अतिशय गंभीर आणि कमकुवत करणारा असू शकतो. याच स्थितीला ‘पोस्टपार्टम डिप्रेशन’ म्हणजे प्रसूतीपश्चात येणारे नैराश्य असे म्हणतात.

  त्या पुढे म्हणतात की, अनेकदा पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास सहन करणाऱ्या स्त्रियांची व्यथा मूकच राहते. त्यांची मनोवस्था कुणाच्याही लक्षात येत नाही, कुणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच एक समाज म्हणून अशा स्थितीतून जाणाऱ्या स्त्रिया ओळखणे आणि त्यांना या मन:स्थितीसाठी योग्य ते उपचार मिळवून देण्यास मदत करणे हे एक समाज म्हणून आपले कर्तव्य आहे.

  समाजाने मदत का केली पाहिजे ?

  कोविड-१९ महामारी आणि त्यामुळे लादले गेलेले सामाजिक एकटेपण यांनी मानसिक आरोग्याच्या प्रश्नांविषयी सार्वजनिक पातळीवर असलेला जागरुकतेचा अभाव ठळकपणे अधोरेखित केला आहे. पण स्त्रियांच्या मानसिक आरोग्याच्या गरजा या पूर्वापार दुर्लक्षितच राहिल्या आहेत. स्त्रिया आपल्या कुटुंबाकडून असलेल्या असंख्य अपेक्षांचे ओझे वाहत असतात व त्या पूर्ण करण्याचे प्रयत्नही करत असतात. पण त्यांच्या आयुष्यातील ताणतणावांना कारणीभूत ठरणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी आव्हानात्मक असू शकतात आणि प्रसूती ही त्यापैकी एक गोष्ट आहे, असे डॉ. कर्वे सांगतात.

  त्या पुढे म्हणतात, बाळाला जन्म देणे आणि त्याला वाढवणे या दोन्ही गोष्टी स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या गोष्टीचा तिला अकल्पनीय असा भावनिक आणि शारीरिक त्रास होतो, यातून मानसिक आरोग्याच्या समस्यांना निमित्त मिळू शकते. या समस्येची लक्षणे पहिल्यांदा गरोदरपणाच्या दरम्यान आणि प्रसूतीनंतर दिसून येऊ शकतात किंवा एखादी जुनी मानसिक समस्या या काळात बळावूही शकते.

  गरोदरपणा आणि प्रसूतीनंतर उद्भवू शकणाऱ्या मानसिक समस्या

  बाळाला जन्म दिलेल्या स्त्रीमध्ये आढळून येणाऱ्या मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्याया पोस्ट-पार्टम ब्लू पासून क्लिनिकल डिप्रेशनपर्यंत अनेक प्रकारचे असू शकतात. १२-१३ टक्‍के महिला गरोदरपणाच्या काळात नैराश्य आणि चिंतातूरता अनुभवतात. बाळाला जन्म दिल्यानंतरच्या पहिल्या वर्षांमध्ये तर हा धोका १५-२० टक्‍के इतका जास्त असू शकतो, असे डॉक्टर सांगतात.

  पोस्ट-पार्टम सायकोसिस हा एक गंभीर स्वरूपाचा भीतीदायक मानसिक आजार आहे, जो अशा आजारांचा अगदी कमी धोका असलेल्या महिलांमध्येही उद्भवू शकतो. या आजाराला तातडीच्या मानसोपचाराची गरज असते. कारण त्यामुळे मातेच्या जीवाला तसेच तिच्या बाळाच्या जीवाला धोका संभवू शकतो, असेही डॉक्टर कर्वे सांगतात.

  डॉ.कर्वे म्हणतात की, बाळाला जन्म दिलेल्या प्रत्येक १००० स्त्रियांमधील १-२ स्त्रियांवर याचा परिणाम झालेला दिसतो. याशिवाय जनरलाइझ्ड एन्ग्झायटी डिसॉर्डर, पोस्ट ट्रॉमॅजिक स्ट्रेस डिसॉर्डर (पीटीएसडी) आणि ऑब्सेसिव्ह कम्प्ल्सरी डिसॉर्डर अशा समस्याही दिसून येतात. गरोदरपणाशी संबंधित एक विशिष्ट मानसिक स्थिती म्हणजे टोकोफोबिया, ज्यात प्रसूती, प्रसूतीवेदना यांविषयी टोकाची भीती वाटते.

  गरोदरपणाच्या दरम्यान अंमली पदार्थांचे सेवन करणे हा काही नवा प्रकार नाही व त्याचा माता आणि जन्माला न आलेले बाळ या दोघांवरही परिणाम होऊ शकतो. या काळात खाण्याच्या सवयींशी संबंधित आजारही (इंटिंग डिसऑर्डर) नव्याने होऊ शकतात किंवा आधीपासून असलेल्या समस्या गरोदरपणामध्ये पुन्हा डोके वर काढू शकतात, असेही डॉक्टर म्हणाल्या.

  गरोदर स्त्रियांमधील मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांना कसे ओळखावे?

  डॉ. कर्वे म्हणतात की,  अशा प्रसंगी प्रेमाने वागून, काळजी घेऊन मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्य महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अशा महिलेशी बोलणे, तिने प्रसूतीचा काळ कसा घालवला याची विचारपूस करणे, तिला उदास वाटते आहे का, मन भरून येत आहे का याची चौकशी करणे असा साध्या कृतींमुळे तिच्या मनात दबलेल्या भावना बाहेर पडू शकतात.

  त्या पुढे सांगतात की, घरच्या कामांमध्ये मदत करणे, तिला पुरेशी झोप मिळेल याची काळजी घेणे, तिला काही काळ स्वत:साठी काढता यावा, तिच्या व्यावसायिक कामांमध्ये तिला मदत मिळावी यादृष्टीने प्रयत्न केल्यास तिच्या मनावरील ओझे कमी करण्याच्या कामी दूरगामी परिणाम होऊ शकतो. तिच्या वागण्यात काही बदल जाणवल्यास किंवा ती आपल्या स्वभावापेक्षा वेगळे वागत असताना दिसल्यास व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घ्या.

  गरोदर किंवा स्तनदा मातांची काळजी घेणारे डॉक्टर्स प्रत्येक भेटीच्या वेळी त्यांच्या मानसिक स्वास्थ्याविषयी आवर्जून प्रश्न विचारतत. त्यामुळे स्त्रीच्या वर्तणुकीत काही बदल दिसून आल्यास तिच्या कुटुंबातील सदस्य/देखभाल करणारे सदस्य यांनी असे बदल डॉक्टरांच्या लक्षात आणून द्यायलाच हवेत, असेही त्या सांगतात.

  डॉक्टर कर्वे यांच्या मते, आधीपासूनच्या काही मानसिक स्वास्थ्यविषयक समस्या असलेल्या महिलांची काळजी मानसोपचार तज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ यांच्यासाथईने इतर मानसिक स्वास्थ्य तज्ज्ञांची टीमकडून घेतली जाते. मानसोपचार तज्ज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ यांच्याबरोबर इतर मानसिक स्वास्थ्य तज्ज्ञांच्या टीमच्या साथीने काळजी घेतली जाते. त्याचवेळी अशा स्त्रीच्या देखभालीमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाला तिच्या स्थितीची, तिच्या गरजांची आणि धोक्याची लक्षणे माहीत असली पाहिजेत.

  डॉक्टर सल्ला देतात की, सुरुवातीची चिन्हे आणि लक्षणे यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. महिलेला मदतीची गरज आहे असे काळजीवाहू व्यक्तींना वाटल्यास त्यांनी लगेचच डॉक्टरांना सूचना दिली पाहिजे. स्त्रियांना विशेषत्वाने त्यांच्या आयुष्यातील या अनेक गोष्टींची मागणी करणाऱ्या टप्प्यामध्ये उद्भवणाऱ्या विशिष्ट गरजांनुसार देखभाल आणि मार्गदर्शनाची गरज भासेल हे लक्षात घ्यायला हवे.

  आपला समाज आज एका अशा टप्प्यावर येऊन उभा आहे, जिथे मानसिक स्वास्थ्याची जपणूक ही चैनीची नव्हे तर नियमितपणे करण्याची गोष्ट बनणे महत्त्वाचे बनले आहे. त्यासाठी आपण काही महत्त्वाची पावले उचलू शकतो. नवमातेच्या गरजा महत्त्वाच्या असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजे. त्याभोवतीचे लज्जास्पद भावनेचे वलय दूर केले पाहिजे व या गरजांची पूर्तता करणे हा रूढ नियम बनावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी चला एक असा समाज घडविण्याचा प्रयत्न करूया, जो महिलांच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित समस्यांची दखल घेईल व तिला आधार देईल, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.