अति विचारांमुळे येते वृद्धत्व; शंशोधनात धक्कादायक खुलासा

वर्तमानकाळात न राहता मन स्वैरपणे भूतकाळ आणि भविष्यकाळात भटकत असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीची वृद्धत्वाकडे वाटचाल अत्यंत जलद गतीने होते, असा दावा नवीन संशोधनात करण्यात आला आहे. डीएनएच्या दोन्ही टोकाला टेलोमिअर्सच्या जोडया असतात. डीएनएमध्ये असलेल्या क्रोमोजोम्सची सुरक्षा करण्याचे काम टेलोमिअर्स करतात. पेशी आणि शरीराचे वय ओळखण्यासाठी टेलोमिअर्सचा वापर करण्यात येतो. वाढणा-या वयानुसार तसेच शारीरिक आणि मानसिक ताणतणावामुळे टेलोमिअर्सचा आकार कमी कमी होत जातो.

ज्या व्यक्ती वर्तमानकाळातील गोष्टी करण्यात रमतात त्यांच्या टेलोमिअर्स लांब असतात तर ज्या व्यक्तींची मने स्वैरपणे भूतकाळ आणि भविष्यकाळात रमलेली असतात, वास्तवात रमत नाहीत, अशा व्यक्तींचे टेलिमिअर्स छोटे असल्याचे सॅन फ्रान्सिस्को येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधनांना आढळले. संशोधकांनी ५० ते ६५ वयोगटांतील २३९ महिलांच्या टेलोमिअर्सची पाहणी केली. मनाचे भटकणे आणि टेलोमिअर्सचे मूल्यमापन एकाच वेळी करण्यात आले.