हवेतील कोरोनाविषयी मिळणार अलर्ट; जाणून घ्या कसे

विकसित करण्यात आलेले दुसरे तंत्र आहे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित एअर प्युरिफायरचे. त्यात बसविण्यात आलेल्या अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पमध्ये बसविण्यात आलेली ट्यूब विषाणूंना नष्ट करते.

    कोरोना व्हायरस फक्त डोळ्यांनी तर आपल्याला दिसत नाही. पण तो आपल्या आजूबाजूच्या पृष्ठभागावर आणि हवेत असू शकतो. जेव्हा तो आपल्या शरीरात जातो तेव्हा चाचणी करून आपल्या शरीरात कोरोना आहे, याचे निदान होते. पण आता तुमच्या आजूबाजूच्या हवेत कोरोना आहे की नाही, हेसुद्धा समजणार आहे. इतकेच नव्हे तर विषाणूंचा खात्माही करणार आहे, अशी दोन उपकरणे भारतीय तज्ज्ञांनी विकसित केली आहेत. केंद्रीय वैज्ञानिक उपकरणे संस्थेच्या (सीएसआयओ) चंदिगड इथल्या प्रयोगशाळेने एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू आहेत का हे तपासण्यासाठी, तसेच या विषाणूंना नष्ट करण्यासाठी अशी दोन नवी उपकरणे विकसित केली आहेत. यापैकी एक एअर सॅम्पलर असून, दुसऱ्या उपकरणाचे नाव एअर प्युरिफायर असे आहे. हे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित आहे. ही उपकरणे घर, शाळा, ऑफिसेस, मॉल तसेच मोठ्या हॉलमध्ये बसवता येऊ शकतात.

    पॅन सीएसआयआर एअर सॅम्पलर
    एखाद्या ठिकाणच्या हवेत कोरोना विषाणू अस्तित्वात आहे की नाही, याची तपासणी करणाऱ्या उपकरणाचे नाव पॅन सीएसआयआर एअर सॅम्पलर असे आहे. या छोट्याशा उपकरणात एअर कॉम्प्रेसर बसवण्यात आला आहे. हा कॉम्प्रेसर हवा आत खेचतो. त्याच्या आतल्या बाजूला एक मेम्ब्रेन आहे. त्यावर हवेतील कोरोना विषाणू जमा होतात. वीज आणि बॅटरीवर चालणाऱ्या या उपकरणाची किंमत सुमारे पाच हजार रुपये आहे. हे उपकरण बाजारात आणण्यासाठी सीएसआयआरने 5 कंपन्यांसोबत भागीदारीही केली आहे.

    अल्ट्रा व्हायोलेट लॅम्प प्युरिफायर
    विकसित करण्यात आलेले दुसरे तंत्र आहे अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पवर आधारित एअर प्युरिफायरचे. त्यात बसविण्यात आलेल्या अल्ट्रा व्हायोलेट लॅम्पमध्ये बसविण्यात आलेली ट्यूब विषाणूंना नष्ट करते. हे अतिनील दिवे सप्लाय डक्टमध्येच कापून फिट केले जातात. एअर प्युरिफायर हा बंदिस्त खोलीत एसी हवा खेळती ठेवतो. डक्टिंग सिस्टीममध्ये जेव्हा हवा परत जाते तेव्हा यूव्ही लाइटच्या माध्यमातून एअर प्युरिफायर हवा पूर्णतः स्वच्छ करतो. यामुळे खोलीत विषाणू न जाता केवळ शुद्ध हवा पोहोचते. हे उपकरण सध्या रेल्वेतले काही कोच, एसी बस, ऑडिटोरियम, सीएसआयआरच्या काही कार्यालयांमध्ये बसविता येऊ शकतात. याची किंमत ठिकाणानुसार 3 हजारांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत असेल.