मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनो लगेच व्हा सावध!; ‘या’ गोष्टी टाळा

सतत होणारी ही डोकेदुखी अचानक मायग्रेनचे रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. यासाठी मायग्रेनच्या समस्या, लक्षणे आणि उपाय अवश्य वाचा.

    आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारीरिक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे. सतत होणारी ही डोकेदुखी अचानक मायग्रेनचे रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते. यासाठी मायग्रेनच्या समस्या, लक्षणे आणि उपाय अवश्य वाचा.

    मायग्रेन म्हणजे काय

    मायग्रेन ही अशी एक समस्या आहे ज्यामध्ये तुमच्या डोक्याचा अर्धा भाग प्रचंड प्रमाणात दुखू लागतो. कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोके दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. मायग्रेन ही एक न्युरोलॉजिकल आरोग्य समस्या आहे. मायग्रेनमध्ये तुम्हाला मळमळ अथवा उलटीचा त्रासही होण्याची शक्यता असते. काही वेळा मायग्रेनमुळे तुमचे डोके जोरजोरात थडथडत आहे असे वाटू लागते. काही जणांचा रक्तदाबही यामुळे वाढू शकतो. मात्र काहीही असले तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी मायग्रेनमुळे होणारी आहे का हे समजू शकते. कारण प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे मुळीच नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण निरनिराळे असू शकते. मायग्रेन एक अनुवंशिक समस्या आहे. मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.

    घ्या ही काळजी

    १. कडक उन्हात घराबाहेर पडू नका

    २. उग्र वासचे परफ्युम लावू नका

    ३. प्रखर उजेडात काम करू नका. झोपताना दिवे बंद करा.

    ४. पुरेशी झोप घ्या. झोपमोड होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी झोपण्यापूर्वीच आजूबाजूचे वातावरण शांत

    ठेवण्यासाठी घरच्यांना विनंती करा.

    ५. ताण- तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. दैनंदिन जीवनात अनेक समस्या आणि चिंताना तोंड द्यावे लागते. म्हणूनच नियमित मेडीटेशन करा. योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल.

    ६. कमी प्रकाशात डोळ्यांवर ताण येईल असे काम करणे टाळा.

    ७. दररोज कमीत कमी १२-१५ ग्लास पाणी प्या. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.

    ८. वातावरणात बदल झाल्यामुळे मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. यासाठी अचानक थंड वातावरणात जाणे टाळा शिवाय उन्हाळ्यात थंड पाणी पिऊ नका.

    ९. उन्हाळ्यात अती घाम सुटेल असे गरम पदार्थ जसे की गरमागरम कॉफी अथवा वाफाळता चहा नका घेऊ.

    १०. गर्भ निरोधक गोळ्यांचा अती वापर करू नका. कारण ओरल पिल्समध्ये प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे हॉर्मोन्स असंतुलित होतात. हॉर्मोन्समधील बदलांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

    डाएट टीप्स

    कोणत्याही आरोग्य समस्येवर योग्य आणि संतुलित आहाराने मात करता येते. शिवाय एखादी आरोग्य समस्या होऊ नये यासाठी आधीच योग्य उपाय केले तर कोणतीही समस्या निर्माण होऊ शकत नाही.

    १. आहारात अधिक प्रमाणात लिक्विडचा समावेश करा. जसे की सूप, लिंबू पाणी, ताक, लस्सी, नारळपाणी

    २. आहारातील मीठाचे प्रमाण कमी करा.

    ३. डाएटमध्ये फळ आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण वाढवा.

    ४. चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

    ५. अधिक प्रमाणात तळलेले पदार्थ खाऊ नका.

    ६. मायग्रेन असेल तर उपवास करणे टाळा.

    ७. चीज, प्रक्रीया केलेले पदार्थ, चमचमीत पदार्थ खाण्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकते.

    ८. हवाबंद केलेले पदार्थ खाणे टाळा.

    ९. पिझा, बर्गर, भटुरे आणि कुकीजसारखे पदार्थ खाण्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.

    १०. योग्य आणि संतुलित आहारासोबत मुबलक प्रमाणात पाणी प्या.