लस घेतल्यानंतर रक्तदान करता येते काय? जाणून घ्या माहिती

कोरोनाच्या लसीकरणानंतर रक्तदान करता येते पण त्यासाठी 'एफडीए'तर्फे काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार..

  समाजात असे अनेक जागरूक नागरिक आहेत जे रक्तदानाचे महत्व जाणतात व नियमित रक्तदान करतात. सध्या कोरोनाच्या लसीकरणाला सुरवात झाली आहे. यामुळे लस घेतल्यानंतर किती दिवसानंतर रक्तदान करता येते असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

  कोरोनाच्या लसीकरणानंतर रक्तदान करता येते पण त्यासाठी ‘एफडीए’तर्फे काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लसीकरणानंतर २ आठवड्याने रक्तदान करता येते.

  या व्यतिरिक्त आणखी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

  रक्‍तदान शिबिर घेण्याचे अलीकडे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय सण वा छोट्या संस्था आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्‍तदानासारख्या उपक्रमाचे आयोजन केले जाते. सामाजिक भावनेतून राबविलेल्या या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असल्याने रक्‍तदानाविषयी जनजागृतही होत आहे.
  रक्‍तदान करताना आणि रक्‍त घेताना पुढील दक्षता घेणे गरजेचे आहे. भरपूर नाष्टा केलेला असला पाहिजे, तसेच धूम्रपान व मद्यपान केलेले नको. गेल्या महिन्याभरात कोणतीही लस घेतलेली नसावी.

  शक्‍यतो कोणतीही औषधे चालू नसावीत. गेल्या तीन महिन्यांच्या आत रक्‍तदान केलेले नसावे. सहा महिन्यांत कोणतीही मोठी शस्त्रक्रिया झालेली नाही याची खात्री करून घेण्याची गरज आहे.

  रक्‍तदान करताना महिलांना मासिक पाळी नसली पाहिजे. तसेच ती गरोदर नसावी. तसेच रक्‍तदान करताना 18 ते 65 वयोगटांतर्गत आणि 45 वजन असले पाहिजे. रक्‍तातील हिमोग्लोबीन 12.5 ग्रॅम टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. रक्‍तदाब 140-90 मिमी मर्क्‍युरीपेक्षा कमी असू नये. तसेच, मधुमेह या आजारावरील गोळ्या घेणाऱ्या रुग्णांची रक्‍तशर्करा नियंत्रित आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. इन्सुलीन घेणाऱ्या व्यक्‍तींनी आणि हृदयरोग असणाऱ्या व्यक्‍तींनी रक्‍तदान करण्याचे टाळले पाहिजे.

  रक्‍ताची पिशवी देताना ठरावीक कोडनंबर देऊन, त्याच पिशवीमध्ये त्याच रक्‍तदात्याचे रक्‍त जमा केले की नाही याची खात्री करून घेण्याची गरज आहे. रक्‍त जमा केल्यावर रक्‍तपेढीमध्ये त्यावर एचआयव्ही, कावीळ, बी व कावीळ सी, मलेरिया (हिवताप) आणि गुप्तरोगांच्या चाचण्या अवश्‍य करणे महत्त्वाचे आहे. रक्‍तगट तपासून आणि चाचण्यामध्ये निकाल निगेटिव्ह (उणे) आढळल्यास रक्‍त ठेवले जाते, अशा प्रकारची खबरदारी घेणेही महत्त्वाचे आहे.

  रक्‍त संक्रमणाविषयी काळजी व चाचण्या

  प्रथम रक्‍त संक्रमण ज्यांना करायचे व ज्यांचे रक्‍त संकलन करायचे त्यांचे रक्‍तगट खात्री केल्यानंतरच क्रॉस मॅचिंग केले जाते. ते क्रॉसमॅचिंग झाले, तरच ती रक्‍ताची पिशवी रक्‍त संक्रमणासाठी पुढे दिली पाहिजे. रक्‍ताची पिशवी देताना त्यावरील क्रमांक, रक्‍तगट, रुग्णाचे नाव व रक्‍तगटाची खात्री करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतरच रक्‍तसंक्रमण सुरू केले जाते.

  रक्‍त देण्याच्या अगोदर रुग्णाची नाडी, ताप व रक्‍तदाब तपासला जातो, त्यानंतर सुरळीत व सावकाश रक्‍त संकलन सुरू केले जाते. कधी कधी रुग्णास ऍलर्जी (रिऍक्‍शन) येऊ शकते. तेव्हा ताबडतोब रक्‍तसंक्रमण बंद करून ती रक्‍ताची पिशवी, रुग्णाचे रक्‍त व लघवी पुढील तपासणीसाठी रक्‍तपेढीत पाठविले जाते. दरम्यानच्या काळात रुग्णाला योग्य ती औषधे देऊन ऍलर्जी (रिऍक्‍शन) आटोक्‍यात आणली जाते.