कोरोनानंतर किचन मध्ये ‘हेल्दी’ पदार्थ वाढले !

  पिंपरी: गेल्या दीडवर्षभरात कधी नव्हते तेवढे ‘इम्युनिटी’चे महत्त्व जगाला पटले आहे. लोकांना आता कळून चुकले आहे की, केवळ कोरोनाच नाही तर कोणत्याही आजारापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर इम्युनिटी अर्थात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणे गरजेचे आहे. यामुळेच सध्या लोकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील असेच पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत.

  कच्च्या भाज्या, कडधान्ये

  कोरोनाच्या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पदार्थांचा वापर वाढला आहे. किचनमधील पदार्थही बदलले आहेत. सध्या आहारात ताज्या फळांचा समावेश जास्त प्रमाणात होत आहे. यासह आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडेंट्स मिळतील, अशा आहाराचा समावेश वाढत आहे. कच्च्या भाज्या, कडधान्यांचा समावेश करण्यात येत आहे.बाजारातून विकत आणलेल्या पालेभाज्या, फळे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्याकडे लक्ष दिले जात आहे. यामध्ये किचनमध्ये व्हेजिटेबल क्लिनरचा वापर वाढला आहे. भाजीपाला धुवूनच घेतला जात आहे. उन्हाळ्यात आंबा, सफरचंद, केळी आणि बीट हे तर खाण्याकडे नागरिकांचा ओढा वाढला. दररोज फळांचा आहारात वापर होत आहे. मोसमी फळांना जास्त पसंती दिली जात आहे.

  प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच

  कोरोना काळात हिरव्या भाज्या, रताळे, शेंगदाणे, मका, बाजरी यांचा आहारात उपयोग करावा. राजमामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. राजमाची भाजी नक्की खावी. दूध हे बऱ्याच पोषक तत्त्वांचे भांडार आहे. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाने दूध पिण्यावर भर द्यावा.फळांमध्ये ए, बी आणि सी ही तिन्ही जीवनसत्वे असतात. याशिवायही शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने फळे खायला पाहिजेत.

  फास्ट फूडवर अघोषित बंदी

  एकीकडे आरोग्याकडे लक्ष देताना लोकांकडून दुसऱ्या गोष्टीकडे अघोषित बंदी आणली आहे, ती गोष्ट म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारे पदार्थ होय. कोरोनाच्या धास्तीने फास्ट फूड पदार्थ टाळण्यात येत आहेत. पाणीपुरी, कचोरी, भेळ, समोसा यांसारखे पदार्थ बाहेरून आणणे टाळले जात आहेत.