“लस आली तरी कोरोना कायम राहणार !”

अख्खं जग सध्या कोरोनावरील लसीची वाट पाहतंय. कोरोना रुग्णांच्या संख्येनं आता ४ कोटींचा आकडा ओलांडलाय. तर जगभरात ११ लाखांहून अधिक व्यक्तींची आपले प्राण गमावलेत. या कोरोनाला जगातून हद्दपार करण्यासाठी लस येणं गरजेचं आहे. मात्र जरी लस आली, तरीदेखील कोरोना शंभर टक्के आटोक्यात येणं शक्य नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सध्या वेगवेगळ्या देशातील सुमारे १५० लसींवर (Covid 19 vaccines) संशोधन (research) सुरू आहे. काहींचं संशोधन अखेरच्या टप्प्यात पोहोचलंय. मात्र जरी कोरोनावरची लस उपलब्ध झाली, तरीही कोरोनाला पूर्णतः रोखता येणं शक्य नाही, असा दावा ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक वॉलेस (Sir Patrick Villance) यांनी केलाय.

हंगामी तापाची साथ जशी असते, तसंच कोरोनाचं स्वरूप त्यानंतर असू शकेल, असंही वॉलेस यांनी म्हटलंय. एखादा ताप आला की दवाखान्यात जाऊन त्यावरचं औषध आपण घेतो. तसंच कोरोना झाल्यावर त्यावर उपचार करून घेणं, हीच लस आल्यानंतरची पद्धत असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

विशिष्ट ऋतुत विशिष्ट आजार बळावत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव थंडीच्या काळात अधिक होतो. ज्या देशांत अधिक काळ थंडी असते किंवा सातत्यानं थंडी असते, तिथं कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक काळ राहण्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.

कोरोनावरील लस आल्यानंतर मात्र या आजाराचं गांभिर्य कमी होईल. इतर आजारांप्रमाणेच कोरोना हादेखील एक आजार असेल. त्याचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण आणि तीव्रताही कमी होईल. त्यानंतर एखाद्या तापासारखा हा आजार असेल आणि जुजबी उपचारांनी बरा करता येईल, असंही वॉलेस म्हणतात.

सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या बऱ्याच लसींनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार केली आहे. मात्र या लसी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखतात का, हे तिसऱ्या टप्प्यातल्या अंतिम चाचण्यांनंतरच समजेल. यातूनच कोरोना लस किती सुरक्षित आहे, हेदेखील कळेल. मोठ्या लोकसंख्येला कोरोना लस कशी दिली जाणार, हा प्रश्नही महत्त्वाचा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.