healthy diet

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा, संसर्गाशी(Corona Spread) लढा देऊन त्यावर मात करण्याचा, अँटीबॉडीज(Antibodies) तयार करण्यासाठीचा तसेच या विषाणू संसर्गामुळे येणाऱ्या थकव्यापासून आराम मिळविण्यासाठीचा पोषक आहार(Nutritious Diet) हा एकमेव मार्ग आहे.याविषयी आहारतज्ञ अपेक्षा एकबोटे यांनी खास मार्गदर्शन केले आहे.

  कोरोना विषाणूचा संसर्ग(Corona Spread) किंवा कोविड -१९ एखाद्या वणव्याप्रमाणे सर्वत्र पसरत आहे. या काळात मास्क घालणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अशाप्रकारची खबरदारी अत्यंत दक्षतेने घेणे महत्त्वाचे आहे. मात्र हे करतानाच आपली रोगप्रतिकारशक्ती घडविण्यामध्ये पोषकतत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावत असतात ही गोष्टही विसरून चालण्यासारखे नाही.

  आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्यातल्या बहुतेकांनी कशायपेये आणि काढे घ्यायला सुरुवात केलीही असेल पण शरीरामध्ये दाहकारक स्थिती निर्माण करणाऱ्या आणि आपल्या विविध अवयवांवर विशेषत: फुफ्फुसे आणि यकृतावर ६-८ महिने टिकेल इतका गहिरा परिणाम करणाऱ्या या विषाणूचा संसर्ग एखाद्या व्यक्तीस झाला तर विविध पोषकतत्त्वांचा समावेश असलेली आहारपद्धती अर्थात न्यूट्रीशन केअर प्लान अंमलात आणणे अनिवार्य आहे. कारण रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा, संसर्गाशी लढा देऊन त्यावर मात करण्याचा, अँटीबॉडीज तयार करण्यासाठीचा तसेच या विषाणू संसर्गामुळे येणाऱ्या थकव्यापासून आराम मिळविण्यासाठीचा पोषक आहार(Diet) हा एकमेव मार्ग आहे. याविषयी आहारतज्ञ अपेक्षा एकबोटे यांनी खास मार्गदर्शन केले आहे.

  महत्त्वाच्या सूचना 

  • आपले हात साबण आणि पाण्याने नीट धुवा. प्रत्येक भाजी/फळे खाण्यापूर्वी शक्यतो ब्राइन/मीठाच्या द्रावणामध्ये धुवून घेण्याची काळजी घ्या.
  • तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा तुम्ही हृदयरोगी असाल तर आपल्या शरीरातील साखरेची पातळी/रक्तदाब यांच्यावर नियंत्रण ठेवा. तुम्ही किडनीसंबंधी आजाराचे रुग्ण असाल किंवा तुम्हाला इतर अनेक आनुषंगिक आजार असतील तर चाचण्यांतून हाती येणारे आकडे अतिशय नियंत्रणात असतील याची काळजी घ्या आणि त्यानुसार तुमच्या आहाराचे नियोजन करण्यासाठी व्यावसायिक आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत करा.
  • सर्वकाळ केवळ ताजे अन्नच खा. साठविलेले अन्न खाऊ नका कारण असे अन्न म्हणजे पुढे होणाऱ्या संसर्गाची नांदी असते.
  • स्तनदा मातांनी स्तनपान देणे सुरू ठेवावे. हो, कोविड झाला असेल तरीही बाळांना अंगावरचे दूध पाजावे कारण स्तनपानामुळे बाळांना संसर्गापासून संरक्षण मिळते व त्यांच्या जगण्यासाठी ते अत्यावश्यक असते.
  • अन्न कायम व्यवस्थित झाकून ठेवा आणि शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत खा.
  • शरीरातील पाण्याची पातळी नीट जपा. त्यासाठी पाणी हा उत्तम पर्याय आहे, पण त्याचबरोबर फळांचा ताजा रस, ताक, लिंबाचा रस आणि सूप्स घेऊनही तुम्ही गमावलेली ताकद परत मिळवू शकता. कॅफेनयुक्त आणि कर्बयुक्त पेये मात्र टाळा.
  • ज्या रुग्णांना उपचारार्थ नुकतीच घशात नळी वगैरे घातली गेली असेल व अन्न गिळण्यामध्ये त्रास होत असेल, अशा रुग्णांनी आहारातून जास्तीत-जास्त पोषकतत्त्वे शरीरात जावीत यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला काटेकोरपणे पाळायला हवा.
  • थेट धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान होते व तुम्हाला संसर्गाची बाधा चटकन होऊ शकते. मद्यपानामुळेही रोगप्रतिकारयंत्रणा दडपली जाते तेव्हा धूम्रपान आणि मद्यपान या दोन्ही गोष्टी टाळायला हव्यात.
  • मीठ सेवनाचे प्रमाण प्रतीदिन पाच ग्रॅ (१ चमचा) इतक्यावरच नियंत्रणात ठेवा. लोणची, पापड, बेकरीचे पदार्थ आणि फास्ट फूड खाण्याला लगाम घालण्याचा प्रयत्न करा. कारण हे पदार्थ आपली रोगप्रतिकारशक्ती आणखी कमी करतात.

  आहारविषयक मार्गदर्शक सूचना – कोविड होऊन गेल्यानंतर शरीरातील पोषकतत्त्वांची पातळी जास्तीत जास्त राखण्यासाठी व शरीर लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी एका समतोल आहारपद्धतीचा उपयोग रुग्णांना होऊ शकतो. अशावेळी शरीराची पोषकतत्त्वांची वाढलेली गरज पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कारण त्यामुळे या काळात रुग्णाचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य परत मिळविण्याच्या कामी त्याची मदत होते. आपले आरोग्य लवकरात लवकर परत मिळविण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारात करावयाच्या काही सुधारणा पुढीलप्रमाणे:

  १) उष्मांक (कॅलरीज): – रुग्णाच्या शरीरातील पोषकतत्त्वांच्या स्थितीनुसार त्याच्या/तिच्या आहारामध्ये पुरेशा कॅलरीजचा समावेश केला पाहिजे. एखादी व्यक्ती मधुमेहग्रस्त असेल तर तिने रक्तातील साखरेच्या पातळीवर देखरेख ठेवून त्यानुसार आपल्या आहाराचे नियोजन करायला हवे. एरवी निरोगी असलेल्या व्यक्तीला कोविड झाल्यास तिने भरपूर कॅलरीज असलेले अन्न थोड्या थोड्या प्रमाणात वरचेवर खाणे उपयुक्त ठरू शकेल. कोविडमधून बरे झालेले शरीर आळसावते, त्याला ऊर्जा देण्यासाठी या कॅलरीजची मदत होईल. चिक्की, प्रोटीन बार्स, केळी किंवा आंब्यांसारखी खूप साऱ्या कॅलरीज देणारी फळे शरीराला झटपट ताकद मिळवून देण्यास मदत करू शकतात.

  २) प्रथिने:-कोविड होऊन गेल्यानंतर शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वाचे ठरणारे पोषकतत्त्व म्हणजे प्रथिने. शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोग्रॅममागे १.२ – १.५ ग्रॅम प्रथिनांचा आहारात समावेश असला पाहिजे. प्रथिनांमुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशी ताज्यातवान्या होतातच पण त्याचबरोबर ते अँटीबॉडीज तयार करण्याच्या कामीही मदत करते आणि शरीराला आजारातून अधिक वेगाने बरे होण्यास प्रोत्साहन मिळते. शाकाहारी व्यक्तींनी दिवसातून २-३ वेळा डाळ, दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: घट्ट दही आणि पनीर, शेंगा इत्यादींचे सेवन केले पाहिजे. तुम्ही मांसाहारी असाल तर दिवसाला एक अख्खे अंडे खाणे फायदेशीर ठरू शकेल. चिकन किंवा मासे यांचाही आठवड्यातून तीनदा जेवणात समावेश करायला हवा. आहारातून पुरेसे प्रथिनं मिळत नसेल तर बाजारात व्यावसायिक विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या प्रोटीन सप्लिमेंट्सचा वापर करता येईल.

  ३)अँटीऑक्सिडन्ट्स:- फ्री रॅडिकल्सना नेस्तनाबूत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अँटीऑक्सिडन्ट्स आणि फळे, नारिंगी-पिवळ्या रंगाची फळे, भाज्या, हिरव्या पालेभाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ इत्यादी अ आणि क जीवनसत्त्वाचे समृद्ध स्त्रोत असलेले या जीवनसत्त्वांचे नैसर्गिक स्त्रोत असणा-या पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या जेवणात असणे अपरिहार्य आहे. दररोज सिट्रस वर्गातील एकतरी फळ आणि गाजर, भोपळा, हिरव्या पालेभाजी सारख्या अ जीवनसत्त्वाची रेलचेल असलेल्या भाजीचे सेवन करायलाच हवे.

  हेल्दी फॅक्ट्स: लोणी, साय, तूप, अवॅकॅडो, मासे, सुकामेवा आणि तेलबिया यांसारख्या पदार्थांद्वारे आपल्या आहारात स्वास्थ्यकारक स्निग्धपदार्थांचा समावेश करा. स्निग्धांशामुळे तुमचे अन्न अधिक सघन बनेल तसेच त्यात ऊर्जेचे बंदिस्त स्त्रोत समाविष्ट असतील.

  एक चांगली, समतोल, सुनियोजित आहारपद्धती तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला पुन्हा एकदा बळकट बनविण्यास व शरीर लवकरात लवकर पूर्ववत करण्यास मदत करू शकते. आपल्या अन्नाची हुशारीने निवड करा व काटेकोर आहारपद्धतीची जपणूक करा. एकाच वेळी भरपूर अन्नावर ताव मारण्याऐवजी थोड्या थोड्या अंतराने थोडे थोडे अन्न खात रहा. तुमचे शरीर ही तुमची ताकद आहे, त्याची काळजी घ्यायलाच हवी.