टायफॉइडची लक्षणं जाणवत आहे?; मग ‘हे’ करा

अपूर्ण उपचार, अयोग्य निदान यामुळे काही व्यक्तीच्या शरीरात (आतड्यात) हे जीवाणू राहतात. अशी व्यक्ती 'वाहक' बनते. संसर्गित व वाहक व्यक्ती मल, मूत्र याद्वारे जीवाणू बाहेर टाकतात.

  टायफॉइड हा विषमज्वर, मुदतीचा ताप, आंत्रिक ज्वर अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. टायफॉइडचा ताप हा सर्व वयोगटांत आढळून येतो. दूषित अन्न व पाणी यामुळे संक्रमित होणारा ताप ‘सालमोनिला जीवाणूंच्या संसर्गामुळे तो होतो. हा जीवाणू केवळ मानवी शरीरामध्येच राहतो. रुग्णांचे रक्त व आतड्यात तो वाढू लागतो. संसर्गानंतर सहा ते तीस दिवसांत लक्षणे दिसू लागतात.

  अपूर्ण उपचार, अयोग्य निदान यामुळे काही व्यक्तीच्या शरीरात (आतड्यात) हे जीवाणू राहतात. अशी व्यक्ती ‘वाहक’ बनते. संसर्गित व वाहक व्यक्ती मल, मूत्र याद्वारे जीवाणू बाहेर टाकतात. अशा व्यक्तीने हाताळलेले अन्न खाणे तसेच दूषित पाणी यामुळे विषमज्वर संक्रमित होतो. संसर्गानंतर ताप, अंगदुखी, भूक कमी लागणे ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. त्याबरोबरच गुलाबी रंगाचे पुरळ येणे, तापाच्या प्रमाणात चढ-उतार, अशक्तपणा ही लक्षणे पहिल्या आठवड्यात दिसतात. दुसऱ्या आठवड्यात थकवा अधिक वाढतो, ग्लानी येते, भूक अतिशय कमी लागते. तिसऱ्या आठवड्यात रक्तस्त्राव, मेंदू ज्वर, न्यूमोनिया होऊ शकतो.

  निदान
  वाइल्ड स्लाइड पद्धती – यात निदान लवकर होते, परंतु निष्कर्ष चुकीचे येण्याची शक्यता अधिक असते.
  वाइल्ड ट्युब पद्धती – या चाचणीचे निष्कर्ष येण्यासाठी 16-24 तास लागतात.
  ब्लड कल्चर – तापाच्या पहिल्या आठवड्यात निदान होते.
  टायफॉइज आयजी, आयजीएम – या तपासण्या क्रोमॅटोग्राफी, एलिसा या तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जातात.
  आजाराचे विशेष निदान करण्यासाठी लघवी, मलमूत्र, बोनमॅरो कल्चर तपासण्या केल्या जातात.

  उपचार
  टायफॉइडच्या आजारावर प्रभावी प्रतिजैविके उपलब्ध असून गरज भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते.
  टायफॉइडचे लसीकरण – तोंडावाटे व इंजेक्शनच्या स्वरूपात उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार इंजेक्शनच्या माध्यमातून लसीकरण प्रभावी असते.

  टायफॉइड कसा टाळता येईल?
  – लसीकरण
  – स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीची हात, नखे यांची स्वच्छता.
  – अशुद्ध बर्फ खाणे टाळणे.
  – ताजे शिजवलेले अन्न खाणे.