कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना फ्ल्यूची लस देणे परिणामकारक, संसर्गाचा धोका होईल कमी- अधिक माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

लहान मुलांना या विषाणूचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग(Corona Spread to Children) होत नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे, हे खरे असले तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये आपण कोविडने बाधित झालेल्या मुलांची संख्या वाढताना पाहिली आहे.

    महामारी सुरू झाल्यापासूनच लहान मुलांना असलेला कोविड-१९ चा(Covid-19) धोका हा पालक, साथीच्या रोगांचे तज्ज्ञ आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. लहान मुलांना या विषाणूचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग(Corona Spread to Children) होत नाही, हे अभ्यासातून दिसून आले आहे, हे खरे असले तरीही गेल्या काही महिन्यांमध्ये आपण कोविडने बाधित झालेल्या मुलांची संख्या वाढताना पाहिली आहे.

    पहिल्या लाटेचा सर्वाधिक फटका हा ६० वर्षांवरील व्यक्तींना बसला, दुसऱ्या लाटेमध्ये युवा पिढीवर परिणाम झाला आणि आता बहुतांश प्रौढ व्यक्तींना एकतर कोरोनाची लागण होऊन गेलेली असल्याने किंवा त्यांनी लस टोचून घेतली असल्याने तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संक्रमणाचा धोका कदाचित अधिक असू शकेल असे म्हटले जाऊ लागले आहे. म्हणूनच या आजारापासून मुलांना संरक्षण मिळावे किंवा त्यांच्याबाबत त्याची तीव्रता तरी किमान असावी यासाठीचे मार्ग तातडीने शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. डॉ. जेसल शेठ यांनी याविषयी मार्गदर्शन केले आहे.

    लहान मुलांना महामारीच्या तिसऱ्या लाटेपासून वाचविण्यासाठी फ्लूची लस 

    इंडियन अकॅडमी ऑफ पीडिआट्रिक्‍सने (आयएपी) ५ वर्षांखालील सर्व मुलांना फ्लूची वार्षिक लस देण्याची शिफारस केली आहे. महामारीच्या काळात यूएसमधील मिशिगन आणि मिसौरीमध्ये हाती घेण्यात आलेल्या कोरोनाबाधित मुलांच्या पाहणीत असे दिसून आले की, २०१९-२० च्या फ्लू सीझनदरम्यान ज्या मुलांना इनअ‍ॅक्टिव्हेटेड इन्फ्लुएन्झा लस देण्यात आली होती त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता काही अंशी कमी झाली तसेच तीव्र स्वरूपाचा कोव्हिड होण्याचा धोकाही कमी झाला.

    फ्लूची लस कोविडच्या तीव्र लक्षणांपासून मुलांचे कशाप्रकारे संरक्षण करते ?

    सार्स-कोव्‍ह-२ आणि इन्फ्लुएन्झा यांच्या साथीमध्ये तसेच चिकित्सात्मक वैशिष्ट्यांमध्ये साधर्म्य आहे. सध्या सुरू असलेल्या कोव्हिड-१९ च्या समस्येमध्ये इन्फ्लुएन्झाची लागण झाली तर हे महामारी ‘ट्विनडेमिक’चे अर्थात जोडसाथीचे रूप धारण करू शकेल; मुलांना फ्लूची लस टोचल्याने होणाऱ्या व्हायरल इंटरफरन्सचा म्हणजे एका आजाराच्या विषाणूच्या संपर्कात आल्याने दुसऱ्या प्रकारच्या विषाणूंविरोधात आपोआप निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीचा कदाचित त्यांना फायदा होऊ शकेल. संसर्गाच्या धोक्याला प्रतिबंध होऊ शकेल आणि संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना तीव्र लक्षणे दिसण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.

    तसेच लसीकरणाच्या माध्यमातून मुलांमध्ये होणाऱ्या इन्फ्लुएन्झाच्या संसर्गाचा प्रतिबंध केल्याने कोव्हिड संसर्गाची चाचणी करून पाहण्याची गरज कमी होईल. त्यातून आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि आरोग्यसेवेसाठीच्या संसाधनांवर अधिकचा ताण येणार नाही. म्हणूनच संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोविड-१९ शी लढा देताना लहान मुलांना इन्फ्लुएन्झाचा प्रतिबंध करणाऱ्या लसीची महत्त्वाची भूमिका असणार आहे अशी शिफारस महाराष्ट्राच्या पीडिएट्रिक टास्क फोर्सने केली आहे.

    मुलांना फ्लू आणि कोविड अशा दोन्ही लशी घेता येतील का?

    एक महत्त्वाची गोष्ट नोंदवणे आवश्यक आहे, ती म्हणजे फ्लूची लस आणि कोव्हिडची लस या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लसीच्या २ शॉट्सच्या दरम्यान ४ आठवड्यांचा अवकाश ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने लहान मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण व्हायला भरपूर वेळ मिळेल आणि विषाणू संसर्गापासून त्यांना सर्व प्रकारची रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होऊ शकेल.