पुरेशी झोप घ्या; अन्यथा शरीरावर होतील ‘हे’ दुष्परिणाम

अपुरी झोप फक्त तुमचा दिवसभराचा मूडच नाही तर तुमच्या शरीरात होणाऱ्या इतर क्रिया ही बिघडवते.

  दररोज पुरेशी झोप न घेतल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे शरीराच्या उत्तम स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे. अपुरी झोप फक्त तुमचा दिवसभराचा मूडच नाही तर तुमच्या शरीरात होणाऱ्या इतर क्रिया ही बिघडवते. चला तर जाणून घेऊया अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम.

  नकारात्मक भावना : झोपेत असताना आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करतो. गोष्टी योग्य मार्गाने ओळखण्यासाठी आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या मनाला म्हणजेच मेंदूला वेळेची आवश्यकता असते. त्यामुळे अपुरी झोप बहुतांश वेळेला अधिक नकारात्मक भावनात्मक प्रतिक्रिया देते.

  स्मरणशक्ती कमी होणे : कमी झोपीमुळे गोष्टी लक्षात ठेवायला आणि नंतर आठवायला त्रास होतो. शिक्षण आणि स्मरणशक्ती या दोन्हीमध्ये झोपेचा मोठा वाटा आहे. पुरेशी झोप न घेता लक्ष केंद्रित करणे आणि नवीन माहिती घेणे अवघड आहे. आपल्या मेंदूकडे अपुऱ्या झोपीमुळे आठवणी व्यवस्थित साठवण्यासाठी पुरेसा वेळ नसतो जेणेकरून आपण नंतर त्यांना परत आठवू शकत नाही.  डिप्रेशन :
  झोपेच्या अभावामुळे मूड डिसऑर्डर होण्याची शक्यता देखील वाढू शकते. एका मोठ्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की जेव्हा आपल्याला निद्रानाश होते तेव्हा आपल्यात उदासीनता वाढण्याची शक्यता पाचपटीने अधिक असते आणि चिंता किंवा पॅनीक डिसऑर्डरची शक्यतादेखील आणखी जास्त वाढते.

  हृदयाशी संबंधित समस्या : जेव्हा आपण निवांत झोपता तेव्हा आपला रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे आपले हृदय आणि रक्तवाहिन्या थोडी विश्रांती घेतात. तुम्ही जितकी कमी झोप घ्याल तितक्या 24 तासांच्या चक्रात तुमचे ब्लड प्रेशर वाढेल. उच्च रक्तदाब हृदय रोग, स्ट्रोक्स सारख्या आजारांचे कारण होऊ शकतो.

  वजन वाढणे : कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींमध्ये वजन वाढण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. कमी झोप घेतल्याने या व्यक्ती इतरांपेक्षा आहार जास्त प्रमाणात घेतात. त्यामुळे त्यांचे शरीर इतरांपेक्षा जास्त जाड दिसायला लागते. 7 तास झोप घेणा-या व्यक्तींना वजन वाढण्याचा त्रास सहसा होत नाही. पण 4 ते 5 तास झोप घेणा-या व्यक्तींना हा त्रास होण्याची दाट शक्यता असते.

  मधुमेह : कमी झोप घेतल्याने शरिरातील हार्मोन्सवर विपरीत परिणाम होण्यास सुरूवात होते. या परिणामामुळे डायबेटिस होण्याची दाट शक्यता असते. कमी झोपेमुळे शरिरातील इंन्सुलिनचे प्रमाण कमी होण्यास सुरूवात होते. ज्याचा परिणाम मधुमेह सारखा आजार होऊ शकतो.