कितीही व्यस्त असाल तरी स्वतःला द्या वेळ

आठवड्यातील वा पंधरा दिवसांतील एक दिवस सगळ्या गॅजेट किंवा तंत्रज्ञानापासून लांब रहा. जसे शरीरातील विषद्रव्य काढून टाकण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातून एक दिवस सगळ्या तंत्रज्ञानाला लांब ठेवा.

  स्मार्टफोन्स आल्यामुळे इंटरनेट सर्फिंग सहज झाले आहे. त्यामुळे सतत ई-मेल चेक करणे, कामासंबंधी फोनवर तासन्तास बोलणे या गोष्टी कार्यालयीन वेळेनंतरही सुरूच राहतात; पण कामाला वेळ देताना तो स्वतःसाठी कमी पडतो. खरेतर ठरवून स्वतःसाठी वेळ राखून ठेवला पाहिजे. त्यामुळे प्रसंगी काम बंद करा आणि स्वतःला वेळ द्या. आपल्या सहकाऱ्यांनाही काही वेळानंतर आपण उपलब्ध नसणार, याची स्पष्ट जाणीव करून द्या. फोन बंद करून टाका. कॉम्प्युटरवरून साईन आऊट व्हा. दररोज संध्याकाळी स्वतःसाठी थोडा वेळ ठेवा. घरी छान अंघोळ करा, पुस्तक वाचा, एखादा व्यायामाचा क्लास लावा किंवा आपल्याला छान मोकळे वाटेल, असा कोणताही छंद जोपासा. त्यातूनही जर समजा कामासंबंधी अतिमहत्त्वाचे संदेश पाहायचे असतील तरीही सातत्याने फोनला चिकटून बसू नका. स्वतःसाठी काढलेल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर ताणातून मोकळे होण्यासाठी करा.

  हव्यास सोडा
  तंत्रज्ञानाच्या ताणात एक महत्त्वाचा ताण असतो तो म्हणजे तंत्रज्ञान सतत बदलत राहते. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर आपल्यालाही सतत बदलत रहावे लागते; पण तंत्रज्ञानामुळे आपला मूड खराब करून घ्यायचा नाही, आपल्याला ज्याची गरज लागते तेच तंत्रज्ञान वापरा. बदलत्या तंत्रज्ञानाला बळी पडण्याने आपल्याच ताणात भर पडेल. जर एखादे तंत्रज्ञान आपल्या कामासाठी वापरणे गरजेचे आहे असे वाटत असेल किंवा ते शिकल्याने आपल्या आयुष्यातील काही गोष्टी सुकर होतील, असे वाटत असेल तर प्रशिक्षण घ्या. उगाच त्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा करून घेऊन ताणात भर टाकू नका.

  समोरासमोर बसून बोला
  सध्या सगळ्याच गोष्टी इंटरनेटवरून होत असल्यामुळे संवादाचा अभाव दिसतो. ई-मेल आणि चॅटिंग हे दोन पर्यायच संवादासाठी वापरले जात असल्याचे दिसते; पण अनेकदा लिहिलेल्या शब्दांतून आपल्याला कुठल्या रितीने सांगायचे किंवा काय सांगायचे आहे, हे चटकन् आत्मसात होत नाही. मग संवादात मिठाचा खडा पडतो. गैरसमज लगेचच निर्माण होतात. त्याशिवाय ई-मेल पाठवल्यानंतर उत्तर येईपर्यंत वाट पाहणे, हा कठीण काळ म्हणावा लागेल. त्यामुळे विनाकारण ताण आणि चिंता वाढीस लागते. या सगळ्यामुळे नको असलेला ताण कमी करण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी तोंडावर बोलून मोकळे व्हा. क्षुल्लक किंवा कमी महत्त्वाच्या काही गोष्टी असतील तर मेसेज करा. आपण तंत्रज्ञानावर नको इतके अवलंबून राहण्याची सवय करून घेतली आहे. त्यामुळे एकमेकांना भेटणे, संवाद साधणे यामुळे आपली नाती टिकण्यास वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल.

  संपर्क निवडीतला चोखंदळपणा
  बऱ्याचदा सोशल मीडियावर काही पोस्ट अशा असतात की, त्यामुळे आपला मूड खराब होतो, विनाकारण ताणही येतो. सोशल मीडिया वारंवार पाहण्याची सवय असल्यामुळे आपल्या चिंतेत विनाकारण वाढ होते. त्यामुळे सोशल मीडियावरही आपले कॉन्टॅक्ट निवड करून वाढवा. उगाच फेसबुकवर येणाऱ्या भारंभार फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करू नका. मित्र निवडीबाबत चोखंदळ रहा. शिवाय आपली वैयक्तिक माहिती देताना विचार करून द्या. जर एखाद्या व्यक्तीसोबत आपण फार संपर्कात राहू शकणार नसू, तर त्यांना नम्रपणे संवादाचे हे माध्यम आपण वापरत नाही, असे बजावून सांगा. आपल्या हाताखालील व्यक्तींसाठी सतत संपर्क ठेवायचा नसेल तर केवळ सहकाऱ्यांसाठी एक अकाऊंट उघडा, आपल्या वेळेनुसार आपल्याला ते चेक करता येईल.

  डिजिटल डिटॉक्स
  आठवड्यातील वा पंधरा दिवसांतील एक दिवस सगळ्या गॅजेट किंवा तंत्रज्ञानापासून लांब रहा. जसे शरीरातील विषद्रव्य काढून टाकण्याचा आपण प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातून एक दिवस सगळ्या तंत्रज्ञानाला लांब ठेवा. खऱ्या जगात जा. पक्ष्यांचे गाणे ऐका. निसर्गाचा आस्वाद घ्या. ई-मेल पाठवण्यापेक्षा कुणाशी तरी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून बोला. मग जेव्हा आपण पुन्हा आपल्या डिजिटल दुनियेत जाऊ तेव्हा कळेल की, आपल्यामुळे जग थांबत नाही, तर ते पुढे गेलेले असतेच. शिवाय अशी कुठलीच गोष्ट नाही जी आपल्यामुळे थांबून राहील, ज्याचा ताण घेत आपण जगायला हवे, अशी कोणतीही गोष्ट नाही.  आपल्या आयुष्यात जगण्याच्या मूलभूत गरजांमध्ये इंटरनेटचाही समावेश झाला आहे. प्रत्येकाकडे आता स्मार्टफोन्स आहेत, त्यामुळे सदासर्वकाळ तो इंटरनेटवर गेम किंवा काम करत असतो. दिवसातला बराचसा काळ आपण कॉम्प्युटर आणि  नेटसर्फिंगमध्येच घालवतो. त्यामुळे थकवा, आळशीपणा आणि प्रेरणा देणाऱ्या गोष्टींचा अभाव आपल्या आयुष्यात वाटत असेल तर या डिजिटल कामापासून जरा उसंत काढा. त्याने आपल्या उत्साहात, उर्जेच्या पातळीत जो फरक पडेल तो तोंडात बोटे घालायला लावणारा आहे.