‘या’ सोप्या उपायांनी करा पॅनिक अटॅकला गुडबाय!

वैद्यकीय तपासण्यांतून या स्थितीबद्दल फारसे काही समोर आले नसले, तरी तुम्ही काही प्राथमिक श्वसनाच्या व्यायामांनी या निराशेच्या आणि भीतीदायक परिस्थितीतून बाहेर पडू शकता.

श्वास कमी पडणे,अतिचिंता आणि स्नायू आखडणे ही लक्षणे आढळल्यास तुम्हाला भीतीचा झटका (पॅनिक अटॅक) आल्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याबद्दल तुम्हाला प्रश्न पडू शकतात. वैद्यकीय तपासण्यांतून या स्थितीबद्दल फारसे काही समोर आले नसले, तरी तुम्ही काही प्राथमिक श्वसनाच्या व्यायामांनी या निराशेच्या आणि भीतीदायक परिस्थितीतून बाहेर पडू शकता. तुम्हाला इतर कोणत्याही आरोग्याच्या समस्या नाहीत. याची डॉक्टरांकडून खात्री करून घेतल्यानंतर तुम्हाला हे व्यायाम करता येतील.

दीर्घ श्वसनाची पुढची पायरी

श्वसनाच्या या तंत्रात अधिक वेळ लागतो, तसेच त्यात हृदयाचे ठोके मोजले जातात. आरामदायक ठिकाणी खुर्चीवर पाठ सरळ ठेवून बसा. आता सुरुवातीला पोटातून आणि नंतर छातीतून हृदयाचे पाच ठोके मोजेपर्यंत श्वास घ्या. हृदयाचे सात ठोके होइपर्यंत श्वास रोखून धरा आणि ९ ठोके मोजत हळूहळू श्वास बाहेर सोडा. मात्र, हृदयविकार असलेल्यांनी हा व्यायाम प्रकार करणे टाळावे.

कार्बन डॉयऑक्साइडचा उच्छ्वास

भीतीचा झटका आल्यानंतर रुग्णाने अधिकाधिक ऑक्सिजन मिळण्यासाठी वेगाने श्वास घ्यावा. त्यामुळे शरीरातील कार्बन डायऑक्साइडची पातळी कमी होईल. त्यानंतर श्वासोच्छासाचा विस्तार करण्यासाठी हातांची ओंजळ करून नाक झाकून हळूहळू श्वास घ्या. त्यामुळे श्वसन यंत्रणेत कार्बन डॉयऑक्साइड पुन्हा येईल.

दीर्घ श्वसन

दीर्घ श्वसनामुळे मन आणि शरीराला आराम मिळतो. आरामदायक खुर्चीवर पाठ टेकवून सरळ बसा. हात सरळ ठेवा. आता ५-६ सेकंद हळूवार श्वास घ्या आणि २-३ सेकंद श्वास रोखून धरा. श्वास सोडताना ७ सेकंदांपर्यंत सावकाश सोडा. दहा वेळा हा व्यायाम करा. दीर्घश्वसनाने तुमचा रक्तदाब कमी होण्यास मदत होईल. पॅनिक अटॅक दरम्यान हा व्यायाम करणे थोडे अवघड जाऊ शकते. मात्र, नियमित सरावाने तुम्हाला यात निष्णात होता येईल.