टोमॅटोचे आरोग्यदायी फायदे

या रसाच्या सेवनामुळे होणारे नुकसान मुख्यत्वे या रसाच्या अतिसेवनाने होत असते. त्यामुळे या रसाचे सेवन करायचे झाल्यास ते योग्य प्रमाणात करणे महत्वाचे आहे. टोमॅटोचा रस हा घरच्याघरी तयार केलेला असावा.

  आपल्या स्वयंपाकामध्ये नियमित वापरला जाणारा टोमॅटो ही भाजी नसून हा फळाचा प्रकार आहे. मूळचे दक्षिण अमेरिकेतून भारतामध्ये आलेले हे फळ भाजीमध्ये, सॅलडमध्ये वापरले जात असून, यापासून सूप, सॉस, चटण्या असे अनेक पदार्थ तयार करता येतात.

  टोमॅटो कच्चा आणि शिजवून अश्या दोन्ही प्रकारे खाल्ला जाऊ शकत असून, याच्या रसाचे सेवनही आवर्जून केले जात असते. या रसामध्ये क्षार, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असून, यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणावर आहेत. या रसाच्या नियमित सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या रसाच्या सेवनाला फायदा आणि नुकसान या दोन बाजू आहेत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये या रसाचा समावेश करण्यापूर्वी याच्या सेवनाचे फायदे आणि नुकसान दोन्ही लक्षात घेणे अगत्याचे आहे.

  असे होतात फायदे
  या फळामध्ये क्षार आणि जीवनसत्वे मुबलक मात्रेमध्ये असली, तरी यामध्ये कर्बोदके आणि प्रथिने मात्र जवळजवळ नाहीतच. त्यामुळे या रसाचे सेवन करताना शरीराला आवश्यक ती कर्बोदके आणि प्रथिने मिळतील या दृष्टीने आहार घेतला जावा. टोमॅटोमध्ये लायकोपीन असून, यामुळे शरीराला रोगप्रतिकारशक्ती लाभते.

  हे तत्व कर्करोग रोखण्यासही सहायक आहे. टोमॅटोच्या रसाचे सेवन हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असून, त्यातील तत्वांमुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहून प्रत्येक अवयवाला त्याच्या गरजेनुसार रक्तपुरवठा केला जात असतो. या रसामध्ये असलेल्या फायटोन्यूट्रीयंट्स मुळे शरीरामध्ये प्लेटलेट्सची संख्या चांगली राहते. या रसाच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाणही नियंत्रित राहण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी या रसाचे सेवन उत्तम आहे.

  प्रोसेस्ड ज्यूसचा वापर नको
  या रसाच्या सेवनामुळे होणारे नुकसान मुख्यत्वे या रसाच्या अतिसेवनाने होत असते. त्यामुळे या रसाचे सेवन करायचे झाल्यास ते योग्य प्रमाणात करणे महत्वाचे आहे. टोमॅटोचा रस हा घरच्याघरी तयार केलेला असावा. बाजारामध्ये कार्टनमध्ये मिळणाऱ्या प्रोसेस्ड ज्यूसमध्ये सोडियम, म्हणजेच मिठाचे प्रमाण अधिक असते. हे अतिरिक्त सोडियम शरीरास हानिकारक ठरू शकते. या अतिरिक्त सोडियममुळे उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते.

  तसेच या रसाचे अतिसेवन हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य नाही. शरीराला आवश्यक ते फायबर मिळण्यासाठी टोमॅटोचा रस पिण्याच्या ऐवजी कच्चा टोमॅटो खाल्ला जाणे अधिक फायद्याचे ठरते. टोमॅटोच्या रसाच्या अतिसेवनामुळे क्वचित अपचन, उलट्या, डायरिया यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात.