ही १० लक्षणे दिसत असतील तर तुम्ही आहात मधुमेहाच्या उंबरठ्यावर

  भारतात जवळपास ७ टक्के लोकं मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह झाला की, मृत्यूच्या दिशेने माणसाचा प्रवास जलदगतीने सुरु होतो.   त्यामुळे या रोगाने आपले दार ठोठावू नये असे सगळ्यांनाच वाटते. त्यासाठी नियमित व्यायाम कारणे, आवडते जंक फूड न खाणे, आवडत नसेल तरी भाज्यांचा, फळांचा रस घेणे, इत्यादी अशी किती काळजी घेतो. स्वस्थ राहण्यासाठी ते आवश्यकही आहे.

  मधुमेह झाला तर अनेक निर्बंध आपल्यावर येतातच आणि इतकी बंधने असलेलं जीवन अतिशय कंटाळवाण सुद्धा वाटू लागतं.मधुमेहामुळे आपण फार कमजोर होतो, रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते व पटकन कोणते ही आजार आपल्याला होऊ शकतात, छोटी जखम जरी झाली तरी रक्तातील अत्याधिक साखरेच्या प्रमाणामुळे ती लवकर भरून येत नाही व चिघळते.

  जखम वाळायला १-२ महिने वेळ लागतो व गँग्रीन होते. याशिवाय, कित्येक आवडत्या पदार्थांवर आपल्याला पाणी सोडावं लागतं, जीवन शैली अत्यंत शिस्तबद्ध बनवावी लागते. इतकी शिस्तबद्ध, की त्या शिस्तीची आपल्याला कैद वाटू लागते.

  इतके सगळे सहन करण्यापेक्षा मधुमेह का होतो व मधुमेह होणार आहे हे वेळीच ओळखून वेळीच यावर उपचार घेतले, तर आपल्याला सुरक्षित राहता येऊ शकते.

  तर आज पाहू मधुमेह का होतो व शरीर आपल्याला याचे कोणते संकेत देतं असते.

  मधुमेह का होतो?

  आपण जे अन्न ग्रहण करतो, ते पोटात पचवले जाते व त्यातील ग्लूकोज हे पुढे पाठवण्यासाठी रक्तात मिसळले जाते. शरीर हे ग्लूकोज इन्सुलिन नावाच्या हॉर्मोन्सच्या मदतीने एनर्जीमध्ये परिवर्तित करते व ही ऊर्जा आपण नित्य कामे करण्यासाठी वापरते.

  कधी कधी हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ नियमित खाल्ल्यामुळे, जेवणात फायबर युक्त पदार्थांचा नियमित समावेश कमी असल्यामुळे किंवा pcod सारख्या इतर कारणांमुळे होणाऱ्या हॉर्मोनल इंबॅलन्समुळे शरीरात ग्लूकोजची पातळी वाढते.

  एक वेळ अशी येते जेव्हा शरीरातील पेशी हे इन्सुलिन स्वीकारणे बंद करतात, ज्यामुळे “इन्सुलिन रेझीस्टन्स”ची स्थिती निर्माण होते व पेशींना पाठवलेले ग्लूकोज सरळ रक्तात मिसळू लागते. ज्यामुळे रक्तातील ग्लूकोज, अर्थात साखर वाढते व याच स्थितीला मधुमेह असे म्हणतात.

  १) भूक शांत न होणे –

  जर प्री – डायबिटिजची स्थिती शरीरात निर्माण झालेली असेल किंवा तुम्ही मधुमेहाच्या अगदी उंबरठ्यावर आलेला असाल, तर किती ही खाल्लत तरी काही वेळाने पुन्हा भूक लागेल.

  जे अन्न तुम्हाला ५-६ तास ऊर्जा पुरवेल असे वाटते, तेच अन्न खाऊन देखील पुरेसे वाटत नाही. हा एक संकेत आहे, की तुमच्या शरीरातील साखर आवश्यकतेपेक्षा अधिक झालेली आहे.

  २) सतत थकवा येणे –

  वर नमूद केल्याप्रमाणे ‘इन्सुलिन रेझीस्टन्स’मुळे ग्लूकोज ऊर्जेत परिवर्तित होत नाही, ज्यामुळे शरीरात ऊर्जेचा अभाव होतो व सतत थकवा जाणवू लागतो.

  ३) सारखी लघवी येणे –

  मधुमेहाच्या रुग्णाला बरेचदा मुत्रविसर्ग होतो, विशेषतः रात्रीच्या वेळी. शरीरातील ग्लूकोजच्या वाढलेल्या मात्रेमुळे किडनीचे शुद्धीकरणाचे काम वाढते ज्यामुळे जास्त लघवी लागते.

  ४) तहान लागणे –

  मधुमेहाच्या रुग्णाला लघवीचा त्रास होत असल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण भरपूर कमी होते व सारखी तहान लागते, घशाला सतत कोरडच पडलेली असते.

  ५) त्वचेला खाज येणे –

  शरीरात पाणी कमी असल्याने, इतर अवयवांना पाणी पुरवठ्यात कमतरता होते. ज्यामुळे त्वचा अत्यंत कोरडी होते व सतत खाज येऊ लागते.

  ६) दृष्टी अंधुक होणे –

  आपल्या डोळ्यांत अगणित अत्यंत नाजूक रक्तवाहिन्या असतात. रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण वाढल्याने, डोळ्यातील या रक्तवाहिन्यांत रक्ताभिसरण नीट होत नाही व त्यांना ईजा होते.

  ज्यामुळे डोळ्यांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही व दृष्टी नाजूक होते. धुरकट व अस्पष्ट दिसू लागते.

  ७) यीस्ट इंफेक्शन्स –

  यीस्ट व फंगस हे मुख्यतः ग्लूकोज वरच जगतात. आपल्या शरीरातील ग्लूकोजचे प्रमाण वाढल्याने आपल्या घामात सुद्धा एक विशिष्ट ग्लूकोज उतरते.

  याचमुळे, यीस्ट व इतर बॅक्टेरियांचा प्रादुर्भाव वाढतो व वेगवेगळी इन्फेक्शन होतात. शरीराच्या सतत ओल्या असणाऱ्या भागावर ही इंफेक्शन्स मोठ्या प्रमाणात होतात.

  ८) जखम लवकर बरी न होणे –

  ग्लूकोज वाढले, की रक्तातील घाव बरे करणारा घटक कमी होतो. त्यामुळे लहानात लहान जखम सुद्धा बरी होण्यास महिनाभर किंवा त्याहूनही अधिक वेळ घेते. जखम चघळून त्याचे रूपांतर गँग्रीन मध्ये सुद्धा होते.

  ९) हात पाय बधीर होणे –

  शरीरात कित्येक अत्यंत लहान रक्तवाहिन्या असतात. वाढलेल्या ग्लूकोजमुळे त्यांना इजा होते व त्या अंगात रक्तस्त्राव नीट होत नाही. ज्यामुळे तिथे नीट रक्ताभिसरण होत नाही व ते अवयव वेळोवेळी बधीर होऊ लागतात.

  १०) लहान मुलांना मधुमेहाचा धोका असण्याचे संकेत –

  गादीत लघवी न करणाऱ्या मुलांना अचानक गादीत लघवी होणे सुरू झाले असेल तर याचे कारण मधुमेह सुद्धा असू शकते.