पोषण माहसाठी महाराष्ट्र पुन्हा सज्ज – मंत्री यशोमती ठाकूर

२०२० मध्ये कोविड-१९ चं संकट असतानाही महाराष्ट्रानं विशेष कामगिरी केलीय. सर्व खबरदारीचे उपाय घेऊन सॅम  बालकांचे व्यवस्थापन व कुपोषण मुक्ती तसंच परसबागा-पोषणबागा निर्मितीचा कार्यक्रम राबवणारं महाराष्ट्र क्रमांक १ चं राज्य ठरलंय.

  मुंबई : कुपोषण घालवू धरु सुपोषणाची संगत, स्थानिक आहाराची झडू दे पंगत. या नव्या घोषवाक्यासह महाराष्ट्र सरकारचा महिला आणि बालविकास विभाग पोषण माहसाठी सज्ज झालाय. सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून यंदाही राष्ट्रीय स्तरावरून साजरा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी पोषण माह मिशन अंतर्गत देशात अव्वल ठरलेल्या महाराष्ट्राने पुन्हा एकदा कंबर कसलीय, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.

  देशातील कुपोषणाची समस्या पुर्णतः नष्ट करून देश सुपोषित व्हावा, यासाठी राष्ट्रीय पातळीवर मिशन राबवण्यात येत आहे. १ सप्टेबर २०२१ पासून सुरू होणा-या अभियानात राज्यातील महिला बालविकास विभागाचे कर्मचारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असणार आहे. तसेच ग्रामपंचायती आणि स्थानिक स्तरावर हे अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेऊन विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये रँली, जनजागृती, प्रचार, प्रसार, परसबागांचे महत्त्व आणि आरोग्याची पंचसुत्री सर्वदूर पोहोचवणे याचा समावेश असणार आहे. यंदाही राज्यात यशस्वीरित्या हे अभियान राबवण्यात येणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली आहे.

  २०२० मध्ये कोविड-१९ चं संकट असतानाही महाराष्ट्रानं विशेष कामगिरी केलीय. सर्व खबरदारीचे उपाय घेऊन सॅम  बालकांचे व्यवस्थापन व कुपोषण मुक्ती तसंच परसबागा-पोषणबागा निर्मितीचा कार्यक्रम राबवणारं महाराष्ट्र क्रमांक १ चं राज्य ठरलंय. तामिळनाडू पाठोपाठ ६३,५२,६३,४४३ सहभागी संख्या नोंदवणारं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरलं तर पोषण माह दरम्यान विशेष मोहीमेद्वारे सॅम आढळून आलेल्या बालकांची संख्या एकूण २०८२३ इतकी होती. यात ९१७३ ग्रामीण आणि ११६५५ शहरी बालकांचा समावेश होता. परसबागा या पोषण बागा झाल्या आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये १३४४९ परसबागा तयार करण्यात आल्या.

  गेल्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत २३०५० बागा तयार करण्यात आल्या आहेत. तर ॲनिमिया मुक्त भारत, बाळाचे १००० दिवस, कुपोषण मुक्ती, गरोदरपणातील काळजी, पोषण-सुपोषण यावर वेबिनार, निबंध स्पर्धा यांच्या मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. कुपोषण मुक्तीसाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग नोंदवण्याचा मानस असून त्यादृष्टीने संपर्क साधला जात आहे, यासाठी राज्याने नुकतीच धडक शोध मोहीम राबवली आहे त्यानुसार  सॅममधील बालकांपर्यंत पोहोचून त्यांना जास्तीत जास्त चांगला आहार आणि योग्य उपचार देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे.

  स्थानिक आहाराला महत्त्व देत ताज्या आणि सेंद्रीय भाज्या आहारात कशा वाढतील याबाबत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही परस बागांच्या निर्मितीबाबत जागृती आणि मार्गदर्शन सातत्याने केले जाणार आहे यंदाही राज्य परस बागांमध्ये नक्कीच आघाडी घेईल असा विश्वास वाटतो आहे. सप्टेंबर पर्यंत राज्यात 13000 परस बागांची निर्मिती झाली आहे.

  आहारा इतकच महत्व आरोग्याच्या दृष्टीने व्यायाम आणि योग आला आहे त्यामुळे योगाविषयी ही जनजागृती या पोषण महा मध्ये केली जाईल असेही  ठाकूर यांनी सांगितले.सन २०२१ च्या आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सॅम मधील आठ हजार २७७ बालके आढळली यापैकी ६ हजार ८६१ सॅम बालकांना ग्राम बाल विकास केंद्रामध्ये दाखल करण्यात आले आहे  तर सॅम ६१६८ बालकांना सकस आहार देण्यात आला आहे