depression

गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट(corona second wave) आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य(mental health) अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट(corona second wave) आली, तर ती सर्वांना महागात पडेल, असा इशारा नुकताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा याविषयी भीती व्यक्त केली असून खबरदारीचे सर्व उपाय नागरिकांनी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटाने केलेल्या आघाताने जगाचे झालेले आर्थिक नुकसान पुढील काही वर्षेही भरून न निघणारे आहे. कोरोनामुळे तसेच इतर आजारांमुळे गेल्या आठ महिन्यात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले असून या सोबतच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले असल्यामुळे अनेक नागरिक मानसिक ताण तणावाखाली आले आहेत.

याबाबात मनोविकारतज्ञ डॉ प्रतीक सुरंदशे सांगतात, कोरोना विषाणू महामारी जर वेळीच आटोक्यात आली नाही तर मानसिक आजार निगडित विविध समस्यांचा महापूर येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यातच भारतामध्ये मानसिक आजार आणि त्यांच्या समस्यांकडे  केले जाणारे दुर्लक्ष पाहता वैद्यकीय क्षेत्रात तारांबळ उडेल, अशी भीती आहे. लॉकडाऊनमुळे शाळांमध्ये मुलांचे एकत्र न येणे, एकत्र न खेळणे, कार्यालयात सहकाऱ्यांशी कमी झालेले संवाद, भेटीगाठी कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा, नोकऱ्यांची झालेली वाताहात याचा एकत्रित परिणाम कुठे ना कुठे प्रत्येकावर झाला आहे.

लॉकडाउननंतर वाढलेली दारू व अंमली पदार्थांची विक्री याचा थेट संबंध कुठे ना कुठे मानसिक आरोग्याशी नक्कीच आहे. पैशाचे सोंग कसे करणार, हाच एक दाहक प्रश्न सर्वांसमोर आहे. त्यामुळे येत्या काळात आत्महत्या, अमली पदार्थांचे सेवन आदी प्रकार वाढण्याची भीती आहे. मानसिक आरोग्य समस्या हे कोरोना महामारीपेक्षाही मोठे संकट आहे व याची दाहकता आज आपण सर्वजण अनुभवत आहे.  मानसिक ताण जाणवत असलेल्या नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करून मदत मागावी. लोकांच्या संपर्कात राहावे, व्यायाम करावा आणि गरज भासेल तेव्हा मनोविकार तज्ञांशी बोलावे. मानसिक ताणतणाव घालवण्यासाठी लोकांनी आपल्या मित्रमंडळी व कुटुंबियांशी सक्रियपणे बोलत राहावे, आपल्या जवळच्या व्यक्तीमध्ये अथवा मित्र परीवारामध्ये नैराश्याची आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची लक्षणे दिसल्यास सावध व्हावे, त्यांच्या शंकांचे निरसन करून देणे ही काळाची  फार गरजेचे आहे.

दरम्यान, महामारीमुळे दहा कोटीहून अधिक लोक गरीबीच्या रेषेतून आणखी खाली जातील, अशी भीती आहे. आर्थिक मंदी आणि मानसिक आरोग्य समस्या पसरवण्यापासून थांबवणे ही सध्या जगासमोरील चिंता आहे. कोरोना विषाणूची लागण आपल्याला होईल का व जर झाली तर आपण त्यामधून बाहेर पडू का? तसेच त्यासोबतच  विद्यार्थ्याना  भविष्याची चिंता, कोलमडलेली आर्थिक व्यवस्था, नोकरी व धंदा गेल्यामुळे कुटुंबावर कोसळणारी आर्थिक संकटांची कुर्‍हाड या गोष्टींची चिंता आज प्रत्येक वर्गातील नागरिकाला आहे व यातूनच मानसिक विकार वाढण्याची भीती आहे अशी माहिती मनोविकारतज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी दिली.