‘नॅशनल न्युट्रिशन वीक’; देशातील बहुतेक माता पोषक आहारापासून वंचित

मुंबई : देशातील सर्व लोक सुदृढ असतील तर आरोग्यदायी राष्ट्र निर्माण होते व त्यामुळे देशाची आर्थिक बाबतीत प्रगती होते. या उद्देशाने १९८२ पासून सप्टेंबरचा पहिला आठवडा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘न्युट्रिशन बोर्ड’तर्फे ‘न्युट्रिशन वीक’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी १ ते ७ सप्टेंबर हा जागतिक पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो.

यानिमित्ताने आहारतज्ज्ञांनी हे निरीक्षण व्यक्त केले आहे. स्तनपान करण्याच्या पूर्ण ६ महिन्यांच्या काळात उत्तम आयोडीनयुक्त पोषण आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून नवमातांनी कॅलरी, प्रथिने, जीवनसत्वे आणि क्षार यांचा समावेश असलेला आहार घ्यावा, अशी माहिती ‘टाटा न्युट्रिकॉर्नर’ च्या पोषण आहार तज्ज्ञ, कविता देवगण यांनी दिली.

प्रसुती झालेल्या माता शारीरिकदृष्ट्या अशक्त झालेल्या असतात. अशक्तपणा घालविण्यासाठी तिला पुरेशा प्रमाणात पोषक आहार घेणे गरजेचे आहे. पण जीवनशैलीतील बदल, नोकरी आणि जागृतीचा अभाव यामुळे त्यांच्याकडून पुरेसा पोषण आहार घेतला जात नाही. याचाच बाळाच्या वाढीवर, पोषणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे परिणाम होत आहे. त्यामुळे या मातांनी आयोडीनयुक्त पोषण आहार घेणे आवश्यक असल्याचे मत पोषण आहार तज्ज्ञ कविता देवगण व्यक्त करतात.

भारतात महिलांमध्ये आयोडीनची कमतरता असल्याचे दिसून आले आहे, परिणामी या मातीतून घेतलेल्या धान्यामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असू शकते. महिला आणि मुले ही आयोडीन कमतरतेच्या विकारास सर्वात जास्त बळी पडतात. गर्भधारणेदरम्यान चांगले आरोग्य राखण्याचे महत्त्व बहुसंख्य मातांना माहीत असते, परंतु गर्भाशयात बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या आयोडीनच्या महत्त्वविषयी त्यांच्यामध्ये कमी जागरूकता असते. गर्भाला आयोडीनचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी महिलांनी गर्भारपणात जास्त प्रमाणात आयोडीन घेणे आवश्यक असते, तरीही गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यांपासून आयोडीनची गरज वाढल्यामुळे अनेक महिलांना आयोडीनची कमतरता नकळत भासतेच. आयोडीनची कमतरता आणि त्याच्याशी संबंधित विकार टाळण्यासाठी उच्च जोखीम असलेल्या लोकांमध्ये आयोडीनच्या अतिरिक्त पूरक पदार्थांची आवश्यकता असू शकते. जागतिक आरोग्य संघटना व ‘युनिसेफ’च्या म्हणण्यानुसार, सर्व गर्भवती मातांना दररोज आवश्यक तितके (२५० एमसीजी) आयोडीन मिळणे आवश्यक आहे.

नवमातांनी असे करावे पोषण आहाराचे नियोजन

आहाराची दिनचर्या आखून घ्या, दिवसातून ५-६ वेळा आहार घ्या, आहारात प्रथिने, हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये आणि पुरेसे पाणी यांचा समावेश असावा.

सुका मेवा, एनर्जी बार, फळे इत्यादी जिन्नस जवळ बाळगा, तेलकट आणि मसालेदार पदार्थ, अतिप्रमाणात चहा व कॉफी पिणे टाळा, नवमातांनी वजन कमी करण्यासाठी योगासने करावी.

नवमातांना प्रसुतीनंतर लगेचच वजन कमी करायचे असेल तर स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असलेला आहार घेणे आवश्यक आहे. तसेच ताज्या भाज्या, फळे आणि प्रथिने व कर्बोदके संतुलित आहार घ्यावा.

व्यायाम आणि योगासनांमुळे कॅलरीज कमी करता येतात आणि स्नायू व हाता-पायांना बळकटी प्राप्त होते, असे पोषण आहार तज्ज्ञ कविता देवगण यांचे मत आहे.

आयोडीन हे मुलांच्या शारीरिक, तसेच मानसिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. यशस्वी व स्वावलंबी राष्ट्र बनण्याचे आपले प्रयत्न सुरू असताना, देशाची भावी पिढी या प्रगतीस हातभार लावण्यासाठी निरोगी असणे आवश्यक आहे.

निरोगी भारतातच समृद्ध भारत उभा राहू शकतो.