अशुद्ध पाणी पिणाऱ्या भारतीयांना कोरोनाचा कमी धोका

घाणीत राहणे आणि खराब गुणवत्तेचे पाणी पिणे, यामुळे ज्या देशातील 'हायजीन' चे प्रमाण कमी आहे, तेथील कोरोना मृत्यूचे प्रमाण स्वच्छ राहणाऱ्या देशांच्या तुलनेत अल्प असल्याचा दावा सीएसआयआर (सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च) संस्थेने आपल्या ताज्या अहवालात केला आहे.

दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतातील घाणीचा संदर्भ देत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या पार्श्वभूमीवर सीएसआयआरचा हा अहवाल आला आहे. अहवालातील दावे खरे असतील तर कोरोनाशी भारत चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकतो. कमी आणि मध्यम उत्पन्न श्रेणीत मोडणाऱ्या देशांना पॅरासाईट तसेच बॅक्टेरियापासून पसरणाऱ्या रोगांचा वारंवार सामना करावा लागतो. यामुळे अशा देशांतील लोकांमध्ये पसरणाऱ्या रोगांचा अनुभव त्यांच्या इम्यून ट्रेनिंगचा हिस्सा बनतो. या प्रॅक्टिसला इम्यून हायपोथिसिस असेही म्हटले जाते.

विकसित देशांमध्ये चांगले हायजीन व संसर्गाचे घटते प्रमाण ऑटोइम्यून डिसॉर्डर तसेच ऍलर्जीसारख्या समस्या निर्माण करतात. ऑटोइम्यून डिसॉर्डर कोविड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूचे सर्वांत मोठे कारण आहे. शरीरातील स्वतःचा हायपरऍक्टिव इम्यून इंफेक्शन नष्ट करणारा सायटोकिन ऑटोइम्यून डिसॉर्डरमध्ये बनतो, असे अहवालात सांगितले आहे.

ऑटोइम्यून डिसॉर्डरची समस्या जास्त जीडीपी असलेल्या देशात म्हणजे विकसित देशात मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळते. याचमुळे या देशातील मृत्यू दर खूप मोठा आहे. भारतासारख्या देशात याच्या उलट पहावयास मिळते. भारतातील ज्या राज्यांचा अथवा शहरांचा इतिहास कुठल्या ना कुठल्या संसर्गाशी जोडला गेलेला आहे, अशा ठिकाणी कोरोनामुळे अल्प मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे.