एकवेळ टूथपेस्टमध्ये मीठ नसले तरी चालेल; पण मिठामध्ये ‘या’ गोष्टी असणे आवश्यक आहे

आजकाल बाजारात मिळणारे बारीक मीठ म्हणजे दळलेले खडेमीठ नाही. समुद्रातून थेट काढलेल्या मिठात सोडियम क्लोराईडसह मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांचे क्षारही असतात. ते आरोग्यासाठी...

  शुद्ध, फ्री फ्लो, दाना दाना एकसमान… इ. वैशिष्ट्ये मिठाला चिकटली आणि हे मीठ उत्तम पॅकेटमधून घरी आले तरच आरोग्याला चांगले, असा भ्रम निर्माण झाला. आयोडीनयुक्त मीठ म्हणजे शुद्ध मीठ हे प्रत्येकाच्या मनावर ठसलेले आहे. जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे पांढरंशुभ्र, हाताला न चिकटणारे, दाणेदार मीठ सरसकट वापरणार्‍यांनी औषधी आणि उपयुक्त खडेमीठ आहारातून वजा केले आहे.

  समुद्री मिठाचे नैसर्गिक गुणधर्म
  समुद्राच्या पाण्यात मुख्यत: मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड असते त्याशिवाय कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम तसेच सोडियम धातूचे क्लोराईड, ब्रोमाईड, सल्फेट बाय कार्बोनेट, बोरेट, फ्लोराईडचे क्षार असतात. हे पाणी मिठागरात वाळवायला ठेवलं की यातले थोडे थोडे क्षार स्फटिकरूप घेऊन पाण्याच्या तळाशी जाऊन बसतात, त्यात सुमारे 85 टक्के सोडियम क्लोराईड असते. पाण्याखाली बसलेले स्फटिक पाण्याबाहेर काढून कडक उन्हात वाळवतात. वरच्या थरातले मीठ पांढरंशुभ्र असते. खालच्या थरातले थोडे मातकट रंगाचे असते. पांढरे मीठ दळून बारीक मीठ म्हणून विकले जाते.

  आजकाल बाजारात मिळणारे बारीक मीठ म्हणजे दळलेले खडेमीठ नाही. समुद्रातून थेट काढलेल्या मिठात सोडियम क्लोराईडसह मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम यांचे क्षारही असतात. ते आरोग्यासाठी आवश्यक असतात. मात्र त्यातील काही क्षारांमुळे समुद्राचं मीठ ओलसर किंवा दमट होते त्यालाच मीठ पाझरणे असे म्हणतात.
  आजकाल बाजारात मिळणार्‍या बारीक मिठात हे क्षार जवळजवळ नसतातच. या बारीक मिठाला फ्री फ्लो मीठ असे म्हणतात.

   

  मीठ आणि साबण निर्मिती प्रक्रिया
  बारीक मीठ बनविणार्‍या प्रमुख कंपन्यांची नावे बघितली तर त्यात टाटा, निरमा, हिंदुस्तान लिव्हर इ. कंपन्या आढळतील. यातील बहुतेक कंपन्या साबण बनविणार्‍या कंपन्या आहेत.

  साबण म्हणजे तेलापासून बनवलेला सोडियमचा क्षार. तेल आणि पाणी एकत्र मिसळून त्यात कॉस्टिक सोडा हळूहळू घालत मिश्रण ढवळत राहतात. कॉस्टिक सोडा पाण्यात विरघळतो. तेल पाण्याबरोबर ढवळत असताना तेलाचे बारीक बारीक गोळे तयार होतात. त्या गोळ्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या तेलाच्या आम्लाशी कॉस्टिक सोड्याची रासायनिक क्रिया होऊन साबणाचे रेणू तयार होतात. ढवळत राहिल्यामुळे आणखी साबण तयार होतो. हा साबण तरंगतही असतो आणि तरलही असतो. तो हळूहळू पृष्ठभागाकडे एकत्र व्हायला लागतो. ही क्रिया वेगवान करण्यासाठी पाण्याचा दाटपणा वाढवावा लागतो. त्यासाठी या साबणाच्या पाण्यात मीठ टाकले जाते. मिठाचे प्रमाण वाढवले की साबण वर तरंगण्याचे आणि एकत्र होण्याचे प्रमाणही वाढते. हा साबण काढून घेतल्यानंतर खाली उरलेल्या पाण्यात बरंच मीठ असते. ते पाणी गाळून, वाळवून त्यातून शुद्ध मीठ मिळविता येते.

  व्हॅक्युम इव्हॅपोरेटेड आणि आयोडाइज्ड मीठ म्हणजे काय?
  बाष्पीभवनाला लागणारी जागा आणि वेळ वाचविण्यासाठी कंपन्या ‘व्हॅक्युम इव्हॅपोरेशन’ या तंत्राचा उपयोग कंपन्या करतात. व्हॅक्युम म्हणजे हवा काढून घेऊन निर्वात पोकळी तयार करतात. अशा पोकळीत हवेचा दाब अतिशय कमी असतो. अशा कमी दाबाच्या हवेखाली असलेल्या मिठाच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते म्हणून हे मिठाचे स्फटिक आकाराने लहान असतात. यात आयोडिनचे क्षार मिसळून ते आयोडाईज्ड मीठ म्हणून बाजारात आणले जाते.

  समुद्री मीठ आणि फ्री फ्लो मिठाची तुलना
  कमी हवेच्या दाबाखाली तयार झालेल्या मिठात सोडियम क्लोराईड या क्षाराचे प्रमाण 95 ते 99 टक्क्यांपर्यंत वाढते. समुद्री मिठात ते 85 टक्केच असते. रक्तदाब, हृदयविकार असणार्‍यांसाठी ते चांगले नाही. समुद्री मिठात सोडियमचे प्रमाण कमी असते. तसेच त्याची चवही अधिक खारट असते. त्यामुळे पदार्थांमध्ये ते कमीच लागते. बारीक मिठात कॅल्शियम, मॅग्नेशियमचे प्रमाण कमी असते. बाष्प शोषून घेण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यात अँटिकेकिंग एजंट वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम कार्बोनेट अशी रसायने त्यासाठी वापरतात. गुटख्यात मॅग्नेशियम कार्बोनेट हे रसायन असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. तेच रसायन आपण मिठातून सर्रास खातो, तेही हेल्दी समजून.

  आर्थिक गणितही समजून घ्या
  साबण उत्पादनातील वाया जाणारे मिठाचे पाणी वापरून त्यापासून मीठ बाहेर काढले जाते. त्यात आयोडीनचे क्षार घातले म्हणून पुन्हा त्याची किंमत वाढते. बारीक भुरभुरणारे मीठ बाजारात आले, त्याच सुमारास आयोडीनच्या कमतरतेविषयी जाहिराती व्हायला लागल्या, हे लक्षात घेतले पाहिजे. आयोडीनयुक्त मीठ वापरण्याच्या आग्रहातून खडेमीठ मागे पडत गेले. प्रत्यक्षात आयोडिनची शरीराला असलेली गरज ही खूप कमी असते. त्यापेक्षा जास्त आयोडिन पोटात गेले तर त्याचेही विपरीत परिणाम होतात.