blood pressure

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना(Corona) महामारीमुळे या व्याधींकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले असून उच्च रक्तदाब(High Blood Pressure) आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची जास्त भीती असल्यामुळे त्यांनी याबाबत दक्ष राहणे महत्वाचे आहे.

  आपल्याला कोरोनाशी(Corona) तर लढायचं आहे परंतु इतर जीवघेण्या आजारांवरसुद्धा आपले लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अगदी चोरपावलांनी आपल्या शरीरात नकळत प्रवेश करणारा उच्च रक्तदाब या आजाराची जागरूकता करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संघटना मे महिना हा राष्ट्रीय उच्च रक्तदाब(High Blood Pressure) जागरूकता महिना साजरा करतात.

  गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे या व्याधींकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले असून उच्च रक्तदाब आजार असलेल्या नागरिकांना कोरोनाची जास्त भीती असल्यामुळे त्यांनी याबाबत दक्ष राहणे महत्वाचे आहे. याविषयी अधिक माहिती देताना  डॉ. प्रदीप शेलार सांगतात, अनियंत्रित उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, हे हृदयविकाराचा झटका वाढण्याचे देशातील सर्वात महत्वाचे कारण आहे. कारण उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसून येत नसल्यामुळे, उच्च रक्तदाबाचे अस्तित्व शोधणे कठीण आहे. उच्च रक्तदाब व्यक्तीस हळूहळू मृत्यूच्या दारात घेऊन जातो. म्हणूनच या रोगाला सायलेंट किलर असे म्हणतात.

  उच्च रक्तदाबाचे आर्टिरियल नावाच्या धमन्यांचे कनेक्शन आहे. आर्टिरियल्स आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियमित करण्यासाठी कार्य करतात. जेव्हा ते पातळ होते, तेव्हा हृदय रक्त पंप पंप करण्यासाठी अधिक प्रयत्न करते. त्यासोबतच नसांमध्ये दबावही लक्षणीय वाढतो. चक्कर येणे, घबराट होणे, घाम येणे आणि झोपेची तीव्रता उच्च रक्तदाबची लक्षणे असू शकतात. परंतु ही लक्षणे इतकी सामान्य आहेत की ९० टक्के नागरिक या लक्षणांकडे हमखास दुर्लक्ष करतात तर कधी कधी नकळत दुर्लक्ष होते.

  लोकांमध्ये रक्तदाबाबद्दल अनेक संभ्रम आहेत आणि योग्य ज्ञानाअभावी अनेक नागरिक रक्तदाब योग्य ठेवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास अयशस्वी ठरतात. गेल्या वर्षी ६ एप्रिलला कोरोना भारतात आल्यानंतर मधुमेह व उच्च रक्तदाब याबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते व ही भीती रास्तही होती. कोरोना भारतात आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच ‘मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका जास्त’, ‘उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना कोरोनाचा विळखा’ असं आपण ऐकत आलो आहोत.

  अनेक नागरिकांनी आपला रक्तदाब नियमित तपासणी सुरु केली तर अनेकांना आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे याचे पहिल्यांदा निदान झाले. कोणत्याही आरोग्य महामारीमध्ये एका ठराविक वयोगटातील नागरिक भरडले जातात. परंतु कोरोनाच्या महामारीमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना कोरोनाची चिंता सतावत आहे.

  उच्च रक्तदाब व हृदयविकाराविषयी अधिक माहिती देताना हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, मधुमेह आणि उच्च-रक्तदाब हे सायलेंट किलर्स आहेत. याची लक्षणं लवकर समजून येत नाहीत. अनेक नागरिकांना आपल्याला मधुमेह, उच्च-रक्तदाब आहे हे माहिती नसते.

  साधारणत: चाळीशीपर्यंत अनेक नागरिक शरीराची नियमित तपासणी करत नाही. त्यामुळे मधुमेह, उच्च-रक्तदाब यासारखे आजार निदान न करताच राहून जातात, त्यामुळे अनेक नागरिकांना हृदयविकाराची लागण होत आहे. उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त असतो. विशेषतः ज्यांना ज्यांना कोरोना झाला त्यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घेणे गरजेचे आहे. उच्च रक्तदाब असलेल्या नागरिकांनी सेल्फ मेडिकेशन करणे टाळावे. रक्तदाब नियंत्रणात असेल, तर कोरोना व इतर आजारांची गुंतागुंत होण्याची शक्यता बरीच कमी होते. त्यामुळेच घरच्या घरी नियमितपणे रक्तदाबाची तपासणी करावी व फॅमिली डॉक्टरांचा टेलिफोनिक सल्ला घेऊन रक्तदाब नियंत्रणात ठेवणे हे लॉकडाऊन काळामध्ये गरजेचे आहे.

  जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये शहरी भागात याचे प्रमाण ६ ते ७ टक्के, तर ग्रामीण भागात ३.५ ते ४ टक्के आहे. वय, अनुवंशिकता, पौष्टिक आहाराचा अभाव तसेच वेळीअवेळी खाणे, स्थुलता, अपुरी झोप, मांसाहाराचे अतिसेवन, तेलकट पदार्थ, तिखट पदार्थ आणि जंक फूडचे अतिसेवन, स्टेरॉइड्सचा वापर मानसिक ताणतणाव आदी घटक उच्च रक्तदाबासाठी कारणीभूत ठरतात.