गरजेपेक्षा कमी झोप झाल्यास वाढतो हृदय विकाराचा धोका; जाणून घ्या झोपेचे महत्व

व्यक्तीने गरजेपेक्षा एक तास कमी झोप घेतली तर दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा धोका २४ टक्के वाढतो....

    धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मोठ्याप्रमाणात लोकांना अनिद्रेची समस्या जाणवत आहे. त्याचा थेट संबंध उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा स्ट्रोकसारख्या आजाराशी आहे. ज्यांची झोप पुरेशी नसते त्यांना चिंता आणि नैराश्याच्या तक्रारी जास्त असतात. एक तास कमी झोपेचाही आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. इल्सइवर जर्नलमधील लेखानुसार, पुरेशी झोप न घेणाऱ्या व्यक्ती आत्महत्या करण्यासारखे विचार करतात. अशा लोकांमध्येच आत्महत्येचे प्रमाणही अधिक आढळले.

    मेंदू : कमी झोप झाल्यास अल्झायमर
    सेंटर फॉर ह्युमन स्लीप सायन्सनुसार, रोज ६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या आणि निद्रानाशाने पीडित असलेल्या लोकांमध्ये मेंदूशी संबंधित अल्झायमर आजार होण्याचा धोका जास्त असतो.

    वय : केवळ ४ तास झोपल्यास वृद्धत्व
    जामा जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, निरोगी व्यक्तीने केवळ चार रात्री ४ तास झोप घेतली तर त्याचा टेस्टोस्टेरोन त्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या व्यक्ती एवढा होतो, म्हणजेच हार्मोन्सच्या आधारे त्याचे वय १० वर्षे वाढते. म्हणजे कमी झोपेने वृद्धत्व वाढते.

    हृदय : झोप कमी, हृदयास धोका
    व्यक्तीने गरजेपेक्षा एक तास कमी झोप घेतली तर दुसऱ्या दिवशी हृदयविकाराचा धोका २४ टक्के वाढतो. ओपेन हार्ट जर्नलनुसार, या अभ्यासासाठी हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या ४२,००० पेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला.

    अँटिबॉडी : ५० टक्के कमी बनतात

    स्लीप हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, लस घेण्याआधीच्या आठवड्यापर्यंत व्यक्तीने पुरेशी झोप घेतली नाही तर लसीकरणानंतर शरीरात केवळ ५० टक्के अँटिबॉडी तयार होतात. कोविड लसीवरील झोपेच्या परिणामाबाबत संशोधन सुरू आहे.