आता तुमच्या आरोग्यावर राहणार स्मार्टवॉचचा ‘वॉच’

रुग्णांना कोविडमधून आपण कशाप्रकारे बरे होत आहोत, आरोग्याची स्थिती कशाप्रकारे सुधारत आहे, यावर लक्ष ठेवता येईल. कारण या वॉचच्या मदतीने...

    कोविड-19 मधून बरे झाल्यानंतरही काही दिवस रुग्णांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरकडे जावे लागते. मात्र, आता असे स्मार्टवॉच आले आहे जे रुग्णांना वेळीच आरोग्यविषयी माहिती देऊन सतर्क करेल. ॲपल कंपनीचे हे वॉच कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याकडे लक्ष ठेवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे.

    ॲपल कंपनीच्या वॉचने आतापर्यंत अनेक युजरच्या आरोग्याची स्थिती ओळखण्यास मदत केली आहे. परिणामी युजरचे प्राणदेखील वाचण्यास मदत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या वॉचद्वारे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा त्रास होत असल्यास वेळीच अलर्ट मिळतो. पण आता हे वॉच कोरोनातून बरे झाल्यानंतर सुद्धा सतर्क करेल.

    एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे, की ॲपल वॉच, फिटबिट स्मार्टवॉच आणि इतर कंपन्यांची वॉच आता कोरोनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांबाबत आपल्याला सतर्क करतात. आपली कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही आपल्याला काही दिवस त्रास होऊ शकतो. त्यावेळी या स्मार्टवॉचचा फायदा होऊ शकतो. कोविड-19 मधून बरे झालेल्या लोकांच्या वर्तणुकीमध्ये आणि शरीरात बदल दिसून येतात. कोविडमधून बरे झाल्यानंतर या वेअरेबल्सद्वारे युजर आरोग्याची स्थिती वेळोवेळी तपासू शकतात.

    तसेच यामुळे रुग्णांना कोविडमधून आपण कशाप्रकारे बरे होत आहोत, आरोग्याची स्थिती कशाप्रकारे सुधारत आहे, यावर लक्ष ठेवता येईल. कारण या वॉचच्या मदतीने श्वसनाची गती, शरीराचे तापमान, शारीरिक हालचाल आणि इतर घटकांवर लक्ष ठेवता येते.