हे जीवनसत्व ठेवतील तुम्हाला तरुण; जाणून घ्या माहिती

ही जीवनसत्वे कोशिकांचे पुनर्निर्माण होण्यासाठी, उत्तम दृष्टी, बळकट स्नायू, उत्तम पचनशक्ती, चांगली झोप ह्यांकरीता दररोज प्रत्येकी 1.3 ते 2 मिलीग्राम इतक्या प्रमाणात आवश्यक आहेत.

  जीवनसत्वे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी (health) अतिशय महत्वाची आहेत. आपल्या शरीरातील सर्व अवयवांची कार्ये सुरळीत चालू रहावीत, शरीराची रोगप्रतीकारशक्ती (immunity) चांगली रहावी ह्याकरिता जीवनसत्वांची आवश्यकता असते. आपल्या शरीराचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला निरनिराळ्या जीवनसत्वांची आवश्यकता असते. ही जीवनसत्वे नेमकी कोणती, ती कोणत्या कामी येतात आणि ती आपल्याला कोणत्या पदार्थांमधून मिळतात, हे जाणून घेऊ या.

  तरूण ठेवणारे ‘ई’ जीवनसत्व
  ‘ई’ जीवनसत्व आपली त्वचा तरूण, सुरकुत्या रहित ठेवण्यासाठी, केसांच्या निरोगी वाढीसाठी महत्वाचे आहे. तसेच प्रजनेन्द्रीयांचे कार्य सुरळीत चालत रहावे ह्यासाठी ही हे जीवनसत्व महत्वाचे आहे. बाहेरील निरनिराळ्या प्रकारच्या प्रदूषणापासून शरीराला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचे कार्य हे जीवनसत्व करते.

  दररोज तीस ते पन्नास मिलीग्राम इतकी ह्या जीवनसत्वाची आवश्यकता आपल्या शरीराला असते.

  ‘अ’ जीवनसत्व डोळे, केस, नखे, हाडांची बळकटी, आणि त्वचेच्या आरोग्याकरिता महत्वाचे आहे. 0.4 ते 1 मिलीग्राम इतक्या प्रमाणात ह्या जीवनसत्वाची आवश्यकता शरीराला असते. हे जीवनसत्व गाजरे, आंबट फळे, चीज, पालक, अंडी, मासे, पार्सली, आंबे, पपई, इत्यादी पदार्थांमध्ये मिळते.

  जखमा लवकर भरणारे के जीवनसत्व
  के (k) जीवनसत्व शरीरावरील जखमा लवकर भरून येण्यासाठी आवश्यक असते. 1 ते 2 मिलीग्राम इतकी ह्या जीवनसत्वाची दैनंदिन आवश्यकता असते. हे जीवनसत्व पालक, फ्लॉवर, गाजरे, टोमाटो, ग्रीन टी इत्यादी पदार्थांमधून मिळते. बी-12 हे जीवनसत्व शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, स्मृती आणि बुद्धी तल्लख राहण्यासाठी आणि पचनयंत्रणा निरोगी राहावी ह्यासाठी दररोज 2 ते 5 मिलीग्राम इतक्या प्रमाणात आवश्यक असते. हे जीवनसत्व सोयाबीन, पालक, मासे, चीज, अंड्याचा बलक, दुध इत्यादी पदार्थांमध्ये असते. डी जीवनसत्व हाडांच्या बळकटीकरिता, शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहावे ह्या करिता, सर्दी-पडसे न व्हावे ह्याकरिता आणि शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जावेत ह्याकरिता दररोज 2 ते 5 मिलीग्राम ह्या प्रमाणात आवश्यक आहे. हे जीवनसत्व चीज, बटर, अंड्याचा बलक, मासे, सी फूड, बटाटे, भाज्यांमध्ये असते.

  स्मृती चांगली ठेवणारे बी 5
  बी 5 हे जीवनसत्व स्मृती चांगली राहावी, मनस्थिती आनंदी रहावी, शरीरातील रक्तकोशिका निरोगी राहाव्यात, आणि हृदयाचे आरोग्य चांगले राहावे ह्या करिता दररोज पाच मिलीग्राम इतक्या प्रमाणामध्ये आवश्यक आहे. हे जीवनसत्व चिकन, अंड्याचा बलक, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, यीस्ट, ओटमील, तांदूळ आणि ब्रोकोली मध्ये असते.

  क (c) जीवनसत्व त्वचा नितळ राहावी ह्याकरिता, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता, केसांचे आणि नखांचे आरोग्य आरोग्य चांगले राहावे ह्याकरिता दररोज 70 मिलीग्राम इतक्या प्रमाणात आवश्यक आहे. शेपू, आंबट फळे, फ्लॉवर, हिरव्या मिरच्या, मटार. मुळा, किवी, इत्यादी पदार्थांमध्ये हे जीवनसत्व आढळते.

  बी 6 हे जीवनसत्व नर्व्हस सिस्टम चांगली राहावी, आणि रक्तकोशिका निरोगी राहाव्यात ह्याकरिता 1.6 ते 2 मिलीग्राम दररोज, ह्या प्रमाणात आवश्यक आहे. कडधान्ये, हिरव्या भाज्या, कोबी, केळी, अक्रोड, गव्हाचा कोंडा, साल्मन मासा आणि मांस ह्या पदार्थांमध्ये हे जीवनसत्व आहे.

  बी 2 आणि बी 1 ही जीवनसत्वे कोशिकांचे पुनर्निर्माण होण्यासाठी, उत्तम दृष्टी, बळकट स्नायू, उत्तम पचनशक्ती, चांगली झोप ह्यांकरीता दररोज प्रत्येकी 1.3 ते 2 मिलीग्राम इतक्या प्रमाणात आवश्यक आहेत. बी 2 हे जीवनसत्व दुध, बदाम, अंडी, मशरूम्स, पनीर, यीस्ट आणि मांस ह्या पदार्थांमध्ये असून, बी 1 हे जीवनसत्व यीस्ट, पोर्क, सुकामेवा, ओट्स, व्हीट ग्रास, आणि कडधान्य ह्या पदार्थांमध्ये आहे.